बेळगाव लाईव्ह :हुबळी येथे पोलिसांनी एका महिला भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करून तिला विवस्त्र केल्याच्या निंद्य घटनेच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्ष आणि भाजप महिला मोर्चातर्फे आज भव्य मोर्चा काढून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला.
हुबळी शहरात गेल्या बुधवारी 7 जानेवारी रोजी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना विवस्त्र केल्याची समाजाला मान खाली घालावी लागणारी निंद्य घटना घडली.
या घटनेचा भारतीय जनता पक्ष बेळगावच्या महिला मोर्चातर्फे आज शुक्रवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. माजी आमदार संजय पाटील, भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत व इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.
यावेळी राणी चन्नम्मा चौकात राज्यातील काँग्रेस सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.
त्या ठिकाणी राज्यपालांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महिलांची सुरक्षा महत्त्वाची असून पोलीस हे समाजात कायदा, सुव्यवस्था आणि शांती अबाधित राखण्यासाठी असतात गुंडगिरी करण्यासाठी नाही. काँग्रेस सरकार राज्यातील शांती व सुव्यवस्था भंग करत आहे.
राज्यात महिलांसोबत केले जाणारे असभ्यवर्तन ही सरकारसाठी शरमेची बाब आहे. हुबळी येथे घडलेल्या घटनेची गृहमंत्र्यांनी निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. भाजप महिला कार्यकर्त्याशी सभ्यवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, हुबळी येथे भाजप कार्यकर्त्या सुजाता हंडी यांच्यावर तेथील पोलीस व कांही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांना विवस्त्र केले आहे.
ही घटना अतिशय निंदनीय असून त्यासाठीच आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. असे गैरप्रकार जर विद्यमान काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत घडत असतील तर ते सरकारसाठी लांछनास्पद आहे. त्यासाठी आम्ही भाजप महिला मोर्चातर्फे सरकारचा निषेध करत आहोत.





