belgaum

डीजीपी रामचंद्र राव यांची हकालपट्टी करा -भाजप महिला मोर्चाची मागणी

0
450
 belgaum

बेळगाव लाईव्ह:कार्यालयात गणवेशात असताना महिलेसोबत असभ्य वर्तन करणारे पोलीस महासंचालक (डीजीपी) के. रामचंद्र राव यांना फक्त निलंबित न करता थेट नोकरीवरून हकालपट्टी करावी. तसेच शिल्डघट्टच्या राजेगौडा याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्ष बेळगाव महानगर जिल्हा -महिला मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज सकाळी जमलेल्या भारतीय जनता पक्ष बेळगाव महानगर जिल्हा -महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष डाॅ. नयना भस्मे, सरचिटणीस शीला गडकरी व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तक्रार दाखल करण्यास आलेल्या एका अबला महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याशी असभ्यवर्तन करणाऱ्या डीजीपी के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. तथापि एवढेच न करता रामचंद्र राव यांना नोकरीवरून काढून टाकावे.

 belgaum

त्याचप्रमाणे शिल्डघट्ट नगरपालिकेचे आयुक्त अमृत गौड यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून नगरपालिका पेटवून देण्याची धमकी देणाऱ्या राजेगौडा याच्या विरुद्ध एफआयआर दाखल होऊनही 6 दिवस झाले त्याला अटक करण्यात आलेली नाही. तेंव्हा त्याला तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, राज्याचे डीजीपी के. रामचंद्रराव यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते आपल्या कार्यालयात एका महिलेशी असभ्यवर्तन करताना दिसतात. या वर्तनाबद्दल आम्ही भाजप महिला मोर्चातर्फे त्यांचा तीव्र निषेध करत आहोत. त्यांना निलंबित करण्यात आले असले तरी त्याहून अधिक कठोर शिक्षा करून संबंधित पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यात यावा.

पोलीस अधिकारीच जर या पद्धतीने वागू लागले तर सामान्य महिलांनी काय करायचे? पोलिसांकडे न्याय मागण्यास गेलेल्या महिलांवरच अशा पद्धतीने असभ्यवर्तन केले जात असल्यामुळे त्यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. एकंदर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे असे सांगून विद्यमान काँग्रेस सरकारच्या राजवटीत राज्यातील महिला असुरक्षित झाल्या असून सर्वत्र एक प्रकारे अराजकता माजली आहे, असा आरोप डॉ. सरनोबत यांनी केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.