belgaum

बेळगावच्या तरुणांची कंबोडियातील सायबर गुन्हेगारी रॅकेटमधून सुटका

0
537
Cen police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह :पोलिसांनी कंबोडियामध्ये ओलीस ठेवून सायबर गुन्हेगारीत भाग घेण्यास भाग पाडले जात असलेल्या बेळगावच्या तीन तरुणांची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी बनावट नोकरीचे रॅकेट चालवणाऱ्या बेळगावच्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

सुटका करण्यात आलेल्या तरुणांमध्ये आकाश कागनिकर, ओंकार लोखंडे आणि संस्कार लोखंडे यांचा समावेश आहे. जवळपास एक महिना परदेशात अडकल्यानंतर कांही दिवसांपूर्वी ते सुखरूप घरी परतले आहेत. पोलिसांनी सांगितले की, या तरुणांना हाँगकाँगमध्ये डेटा-एंट्रीच्या दरमहा 1 लाख रुपये इतक्या उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवण्यात आले होते.

ही ऑफर बेळगावमधील एका स्थानिक एजंटमार्फत देण्यात आली होती. मात्र, भारतातून निघाल्यानंतर या तरुणांना हाँगकाँगऐवजी कंबोडियाला नेण्यात आले. तिथे त्यांना व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतातील लोकांना लक्ष्य करून ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जात होते. जेंव्हा त्यांनी नकार दिला, तेव्हा त्यांना मारहाण करून धमक्या देण्यात येत होत्या, असे पोलिसांनी सांगितले.

 belgaum
Cen police station

आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल चिंतित असलेल्या पालकांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी बेळगाव सीएन पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. तातडीने कारवाई करत बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आणि कंबोडियामधील भारतीय दूतावासाला सतर्क केले. त्यानंतर, कंबोडियन अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर छापा टाकला आणि एका मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला.

त्या ठिकाणी भारत आणि इतर देशांतील सुमारे 50 तरुणांना बेकायदेशीर कामांमध्ये जबरदस्तीने गुंतवले जात होते. “तिन्ही तरुणांना कांही दिवसांपूर्वी सुखरूप भारतात परत आणण्यात आले आहे,” असे पोलीस आयुक्त बोरासे यांनी सांगितले.

अधिक तपासात असे समोर आले की, हा बनावट नोकरीचा रॅकेट बेळगावातील तीन व्यक्ती चालवत होते. पोलिसांनी सांगितले की, निरीक्षक जे. एम. कलिमिर्ची आणि त्यांच्या पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे पीडितांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सुटकेनंतर एका विशेष पोलीस पथकाने फरार असलेल्या तिघा आरोपींचा शोध घेतला आणि तिघांनाही अटक केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.