बेळगाव लाईव्ह :विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (VTU), बेळगाव येथील एस. जी. बाळेकुंद्री केंद्रीय ग्रंथालय व माहिती केंद्राच्या वतीने “इंजिनिअरिंग ग्रंथपालशास्त्र” या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद (VTUNCEL–2025) चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २२ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृह, ज्ञान संगम कॅम्पस, VTU, बेळगाव येथे होणार आहे.
परिषदेचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून, बंगळूर उत्तर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व कर्नाटक राज्य उच्च शिक्षण परिषद, बंगळूरुचे कार्यकारी व सामान्य मंडळ सदस्य प्रा. टी. डी. केंपराजू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचे मुख्य भाषण VTU कन्सोर्टियमचे सल्लागार प्रा. मुत्तय्या कोगनूरमठ हे देणार आहेत. तर, VTU चे कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न होणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेकरिता देशभरातील २०० हून अधिक ग्रंथपाल व ग्रंथालय व माहितीशास्त्राचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. परिषदेत एकूण आठ विशेष व्याख्याने तसेच ७२ संशोधन प्रबंधांचे सादरीकरण होणार आहे.
ही परिषद अभियांत्रिकी शिक्षणातील ग्रंथालय सेवा, डिजिटल संसाधने, संशोधन सहाय्य प्रणाली आणि आधुनिक ग्रंथपालशास्त्राच्या नव्या प्रवाहांवर सखोल चर्चा घडवून आणणार असून, देशभरातील ग्रंथपाल व संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.




