बेळगाव लाईव्ह: बेळगावमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत असताना त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली नसबंदी मोहीम पुन्हा एकदा थांबली आहे. हिरेबागेवाडी येथील तात्पुरत्या शेडमध्ये नसबंदीचे काम करण्याचा निर्णय बेळगाव महानगरपालिकेने घेतला असला तरी, प्रत्यक्षात पाणी, वीज आणि अन्य मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत तेथे एकाही कुत्र्याचे निर्बीजीकरण झालेले नाही.
बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महानगरपालिकेने आवश्यक यंत्रसामग्रीची व्यवस्था केली होती आणि आसाममधून दोन प्रशिक्षित कुत्रे पकडणारे कर्मचारी देखील आणले होते. तथापि नसबंदी करण्यासाठी शेड उपलब्ध नसल्याने काम सुरू होऊ शकले नाही. कोणत्याही सुविधा नसल्यामुळे संबंधित दोन कर्मचाऱ्यांना कोणतेही काम न करता परत जावे लागले आहे.
नसबंदी मोहीम प्रत्यक्षात सुरू होण्यास किमान दोन ते तीन आठवडे लागू शकतात असे सूत्रांचे म्हणणे आहे. पर्यावरण अभियंता अशोक कुमार सज्जन यांनी या विलंबाला दुजोरा देत नसबंदी अद्याप सुरू झालेली नाही आणि सुविधांच्या कमतरतेचे कारण देत मोहीमला आणखी कांही वेळ लागेल, असे स्पष्ट केले.
शहरात भटक्या कुत्र्यांशी संबंधित घटना वाढत असताना हा विलंब झाला आहे. नागरिक वारंवार तात्काळ कारवाईची मागणी करत आहेत, परंतु खराब नियोजन आणि कमकुवत अंमलबजावणीमुळे ही मोहीम घोषणा आणि फायलींपुरती मर्यादित राहिली आहे.
नगरसेवकांनी यापूर्वी हिरेबागेवाडी येथील तात्पुरत्या शेडची पाहणी केली होती आणि अधिकाऱ्यांना विलंब न करता नसबंदी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ही मोहीम एका आठवड्यापूर्वी सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.
तथापी त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेपासून ते मूलभूत सुविधांपर्यंतच्या सबबी देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महापौर आयुक्त आणि संबंधित नगरसेवक या संदर्भात कोणती ठोस भूमिका घेतात तसेच भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम प्रत्यक्ष कधी सुरू होते? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. तोपर्यंत मोकाट कुत्र्यांचा धोका आणि नागरिकांची असुरक्षितता कायम राहण्याची शक्यता आहे.





