बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून चार जणांना अटक केली आहे. यात अमली पदार्थांचे सेवन करणारे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे आणि मटका जुगार खेळवणाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांत पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मंगळवार पेठेतील सार्वजनिक उद्यानात बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्या एका तरुणाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अशोक गुंडू भजंत्री (३१, रा. अनगोळ, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई असतानाही तो ओल्ड मंक कंपनीच्या दारूच्या पाऊचसह आढळला. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पी. जी. डोळ्ळी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर सर्कलजवळ अमली पदार्थांचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. नदीम हुसेनसाब देसाई (३३, रा. शिवाजी नगर, बेळगाव) असे या आरोपीचे नाव असून, तो अमली पदार्थाच्या नशेत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
हिरेबागेवाडी पोलिसांनी देखील अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. निखिल बसवराज हंपण्णवर (२०, रा. बस्तवाड) असे त्याचे नाव असून, तो राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील बस्तवाड बस स्थानकाजवळ संशयास्पद स्थितीत आढळला. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. के. मिटगार यांनी ही कारवाई केली. वैद्यकीय चाचणीनंतर या तरुणावर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिरेबागेवाडी पोलिसांनी दुसऱ्या एका कारवाईत मटका जुगार खेळवणाऱ्या एका बुकीला अटक केली. भीमप्पा सिद्धप्पा नाईक (५०, रा. काकती) असे त्याचे नाव असून, तो कुकडोळ्ळी येथील सार्वजनिक ठिकाणी ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळवत होता. उपनिरीक्षक बी. के. मिटगार यांच्या पथकाने छापा टाकून त्याच्याकडून १३०० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. आरोपीविरुद्ध कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चारही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, अवैध दारू आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी (डीसीपी) या धडक मोहिमेत सहभागी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.





