belgaum

मोकाट कुत्र्यांची समस्या हाताळण्यासाठी प्रभागवार नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
301
Street Dogs
Street Dogs file photo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रास-उपद्रवाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बेळगाव महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागासाठी एका समन्वय (नोडल) अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, प्रत्येक प्रभागातील आरोग्य निरीक्षक तडकाफडकी नोडल अधिकारी म्हणून कामाला लागतील. त्यांना त्यांच्या प्रभागातील भटक्या कुत्र्यांची नोंदणी करणे, निश्चित केलेल्या खाद्य क्षेत्रांची ओळख पटवून देणे आणि त्यांची माहिती देणे, तसेच एक सुनियोजित दृष्टिकोन वापरून भटक्या कुत्र्यांची समस्या कमी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग आणि प्राणी कल्याण संस्थांशी समन्वय साधण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

महानगरपालिकेने नागरिकांनाही स्पष्ट सूचना दिल्या असून त्यांना त्यांच्या घरासमोर भटक्या कुत्र्यांना खायला न घालण्याचे निर्देश दिले आहेत. फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच त्यांना खाद्य देण्याची परवानगी असेल आणि कच्चे मांस खायला घालण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

आरोग्य निरीक्षकांना प्रभाग स्तरावर जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्याकडेला कचरा टाकल्यामुळे भटक्या कुत्र्यांना आकर्षित करणारे ‘ब्लॅक स्पॉट्स’ तयार होत असल्यामुळे महापालिकेने रस्त्यांवर कचरा टाकण्यास बंदी घातली आहे आणि स्वच्छता विभागाला दररोज तातडीने कचरा गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कर्नाटक महानगरपालिका अधिनियम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2018 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील हॉटेल्स, चिकन आणि मटण दुकानांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आणि आस्थापनांमधील कचरा रस्त्यावर टाकला जाणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंड आकारला जाईल.

प्रत्येक प्रभाग-स्तरीय समन्वय अधिकाऱ्याने दर 15 दिवसांनी सविस्तर अहवाल सादर करणे आवश्यक असणार आहे. या संपूर्ण मोहिमेच्या देखरेखीची जबाबदारी विभागनिहाय पर्यावरण अभियंत्यांवर सोपवण्यात आली आहे. तसेच अशोककुमार सज्जन यांची या मोहिमेसाठी मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, हे आदेश प्रत्यक्षात जमिनीवर प्रभावी कृतीत रूपांतरित होतात की नाही? याकडे नागरिक आता बारकाईने लक्ष ठेवून आहेत. महापालिकेने आक्रमक आणि धोकादायक कुत्र्यांची ओळख पटवण्याचे आदेशही दिले आहेत. आवश्यकतेनुसार मोकाट कुत्र्यांना निवारागृहांमध्ये हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.