बेळगाव लाईव्ह : शिक्षण, व्यापार आणि उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या बेळगावमधील रद्द करण्यात आलेल्या विमान सेवा तात्काळ सुरू कराव्यात, यासाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (बीसीसीआय) नेतृत्वाखाली सर्व औद्योगिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी बीसीसीआयच्या कार्यालयात झालेल्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच केंद्र सरकारला यासंदर्भात निवेदन सादर केले जाणार आहे.
बेळगाव स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, काही विमान कंपन्यांनी अचानक सेवा बंद केल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
बेळगाव हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवरील मोक्याचे ठिकाण असून येथे मराठा लाईट इन्फंट्री आणि भारतीय हवाई दलाचे मोठे केंद्र आहे. तसेच पाच ते सहा वैद्यकीय महाविद्यालये असलेले हे मोठे शैक्षणिक केंद्र असून परदेशी विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अशा महत्त्वाच्या शहराची विमान सेवा खंडित होणे हे दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले.

औद्योगिक दृष्टिकोनातून बेळगावचा झपाट्याने विकास होत असून येथे फाउंड्री, हायड्रोलिक, एरोस्पेस आणि प्रिसिजन इंजिनिअरिंगचे मोठे जाळे पसरलेले आहे. कर्नाटक राज्यात बेंगळुरू नंतर सर्वाधिक जीएसटी बेळगावातून भरला जातो आणि मोठ्या प्रमाणात मालाची निर्यातही होते. एवढे आर्थिक महत्त्व असूनही बेळगावच्या विमान सेवा कमी करणे हा एक प्रकारचा अन्याय असून, यासाठी सर्व संघटनांनी आता संघटित लढा देण्याचे ठरवले असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
या संदर्भात जिल्हाधिकारी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहे. बेळगावच्या प्रगतीसाठी रद्द झालेल्या विमान सेवा पुन्हा सुरू होणे किती अनिवार्य आहे, हे सरकारला पटवून दिले जाईल.
सर्व प्रसारमाध्यमांनी या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आमचा आवाज बनून साथ द्यावी, अशी विनंतीही नितीन लांडगे यांनी यावेळी केली. या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





