belgaum

कसा झाला साखर कारखाना बॉयलर अपघात

0
870
 belgaum

बेळगाव लाईव्ह:बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावाजवळ असलेल्या इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण बॉयलर स्फोटाने औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पाच जण गंभीर भाजले आहेत.


कारखान्यातील ऊस रस उकळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एव्हीसीपी क्रमांक १ या बॉयलरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात घडला. सुमारे ४० फूट उंच असलेल्या या बॉयलरवरील कर्फ्यू वॉल दुरुस्तीच्या वेळी नट-बोल्ट काढत असताना अचानक प्रचंड दाबाने उकळते पाणी बाहेर फेकले गेले. क्षणार्धात खाली काम करणाऱ्या कामगारांवर गरम पाणी कोसळले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.


स्फोटाचा आवाज ऐकताच कारखान्यातील इतर कामगार घटनास्थळी धावले. गंभीर भाजलेल्या कामगारांना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दोघांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर आणखी एका कामगाराने उपचार सुरू असताना प्राण सोडले.

 belgaum


या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाच कामगारांवर सध्या बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मृतांमध्ये अक्षय चोपडे (४५, जमखंडी), दीपका मुनवळी (३१, नेसरगी) आणि सुदर्शन बानोशी (२५, चिक्कमुनवळी, खानापूर तालुका) यांचा समावेश आहे.


जखमींमध्ये भारत बसप्पा सरवाडी (२७, गोडचिनमल्की – गोकाक), राघवेंद्र गिरीयाल (३५, गोकाक), मंजी टेरदाळा (३५, अथणी), मंजी कजगारा (२८, अरवळ्ळी – बैलहोंगल) आणि गुरु तामण्णावर (मारेगुड्डी, बागलकोट) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आय. एम. मठपती यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बॉयलर बंद अवस्थेत असताना स्फोट कसा झाला, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत चौकशी सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


औद्योगिक सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे निष्पाप कामगारांचा बळी गेला असल्याचा आरोप करत कारखान्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.