बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील ऑटो रिक्षा चालकांनी वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि घटती कमाई यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. बेळगाव ऑटो रिक्षा मालक व चालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
ऑटो चालकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
१) किमान भाडेवाढ निश्चित करावी :
ऑटो प्रवाशांसाठी पहिल्या १.५ किलोमीटरपर्यंत किमान भाडे ₹५० निश्चित करावे. त्यानंतर १.५ किमीपेक्षा अधिक अंतरासाठी प्रति किलोमीटर ₹३० दर लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२) ओला, उबर व रॅपिडो बाईकवर कारवाई :
माननीय उच्च न्यायालयाने ओला, उबर व रॅपिडो बाईक सेवा रद्द केल्या असतानाही शहरात या सेवा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप ऑटो चालकांनी केला आहे. अशा अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर तात्काळ बंदी घालून संबंधित चालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे.

३) अनधिकृत इलेक्ट्रिक ऑटोवर बंदी :
परमिट नसलेले इलेक्ट्रिक ऑटो शहरात खुलेआम प्रवासी वाहतूक करत असून त्यामुळे अधिकृत ऑटो चालकांचे नुकसान होत आहे. अशा ई-ऑटोची वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
४) प्रवास मर्यादा वाढवावी :
सध्या ऑटो रिक्षांसाठी १६ किमीची प्रवास मर्यादा आहे. ही मर्यादा वाढवून ३० किमी करावी, जेणेकरून चालकांना अधिक उत्पन्न मिळू शकेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ऑटो चालकांनी या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. मात्र जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी येत्या दोन दिवसांत संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन या मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे शहरातील हजारो ऑटो चालकांचे लक्ष लागले आहे.





