बेळगाव लाईव्ह:संभाजी महाराजांचे बलिदान आपल्याला आजही जागं करतं. त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे संकटातही सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा मार्ग. आज समाजात फूट पाडण्याचे, हिंदूंना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी इतिहास आठवणे आणि त्यातून बोध घेणे अत्यंत आवश्यक आहे असे मत अनिल महाराज देवळेकर यांनी मांडले.
हिंदुत्वाची जाणीव, इतिहासाची आठवण आणि एकतेचा संदेश देणारा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम रविवारी उचगाव येथील मळेकरणी देवस्थानाच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते अनिल महाराज देवळेकर यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश व स्नेहभोजन कार्यक्रम रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी उचगाव येथील मळेकरणी देवस्थान आवारात उत्साहात पार पडला. धनंजय जाधव मित्र परिवाराच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार इराणा कडाडी, बेळगाव महापौर मंगेश पवार, श्रीराम सेना प्रमुख रविकुमार कोकितकर, खानापूरचे नेते संजय कुबल, पंडित ओगले, मल्लिकार्जुन माद्दनावर, चेतन अंगडी, बेळगाव उपमहापौर वानी जोशी व रेश्मा पाटील, भाजपा राज्य माध्यम समिती सदस्य एफ. एस. सिद्धनगौडर, अशोक देसाई, भाजपा नेते इराण्णा रोटी, माजी तालुका पंचायत सदस्य कल्लाप्पा संपगावी, आजरा शेतकरी संघटना प्रमुख संजय देसाई, उचगाव पंचक्रोशीतील माजी सैनिक बाळाराम बेळगुंदकर, माजी नगरसेवक बसवंत हलगेकर, माजी तालुका पंचायत सदस्य महांतेश आलाहाबादी, माजी आमदार मनोहर कडोलकर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे केंद्रबिंदू धनंजय जाधव यांनी आजच्या काळात हिंदू एकतेची गरज अधोरेखित केली. बांगलादेशातील घटनांचा संदर्भ देत, सर्वांनी सजग राहून एकता टिकवावी, असे आवाहन त्यांनी केले. पंडित ओगले, संजय कुबल व इराणा कडाडी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोमल गावडे यांनी केले, प्रास्ताविक पंकज घाडी यांनी मांडले, तर स्वागतगीत मानसी मुकुंद गोखले यांनी सादर केले. धनंजय जाधव व सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा मेळावा यशस्वी ठरला. यंदा या उपक्रमाने २९ वर्षांचा टप्पा पूर्ण केला.





