बेळगाव : खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन (भा.आ.से.) यांनी दिले आहेत. यासंदर्भातील अधिसूचना 27 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आली आहे.
संविधानातील अनुच्छेद 243(ई) तसेच कर्नाटक ग्राम स्वराज व पंचायत राज अधिनियम 1993 नुसार ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून पाच वर्षांचा असतो. 2020 ते 2025 या कालावधीत स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2026 या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना संपत आहे.
या पार्श्वभूमीवर 2026 ते 2031 या कालावधीसाठी नवीन ग्रामपंचायत निवडणुका होऊन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे, यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतरच्या पुढील दिवसापासून हे प्रशासक आपला पदभार स्वीकारणार आहेत.
नियुक्त प्रशासकांना ग्रामपंचायतींचे सर्व अधिकार व कर्तव्ये बजावण्याचा अधिकार राहील. नवीन निवडणूक होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. ही नियुक्ती पदनिहाय असल्यामुळे संबंधित अधिकारी बदली झाल्यास त्या पदावर कार्यरत अधिकारी आपोआप प्रशासक म्हणून काम पाहतील.
खानापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी लोकनिर्माण विभाग, पंचायत राज विभाग, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी विभाग, हेस्कॉम आदी विभागांतील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या आदेशांची अंमलबजावणी संबंधित तहसीलदारांमार्फत केली जाणार आहे.





