बेळगाव लाईव्ह :”सीमाभागात कन्नड संघटनांकडून पोलिसांच्या संगनमताने मराठी भाषेची गळचेपी केली जात आहे. बेळगावचे वातावरण बिघडवण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण लढा दिला नाही, तर आपल्याला गुलामीची सवय होईल,” असा खणखणीत इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांनी दिला आहे. बेळगाव येथील मराठा मंदिर येथे आयोजित युवा समितीच्या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या बैठकीत संपूर्ण सीमाभागामध्ये ‘मराठी सन्मान यात्रा’ काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रवाहातून बाहेर गेलेल्या युवकांना आणि मराठी भाषिकांना पुन्हा या लढ्यात सक्रिय करण्यासाठी ही यात्रा मैलाचा दगड ठरेल, अशी संकल्पना शुभम शेळके यांनी मांडली. कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुचवल्यानुसार, २१ जानेवारीच्या न्यायालयीन प्रक्रियेला कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी या तारखेनंतर मध्यवर्ती समितीच्या नेत्यांशी चर्चा करून यात्रेची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे.
बैठकीत गजानन शहापूरकर यांनी लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. राष्ट्रीय पक्षातील लोकप्रतिनिधी केवळ मतांसाठी मराठीचा वापर करतात, मात्र प्रशासकीय पातळीवर मराठी भाषेचा आग्रह धरत नाहीत, असे ते म्हणाले. मराठी नगरसेवकांनी मराठीसाठी ठोस प्रयत्न न केल्यास त्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच, निवडणुकीपुरता मराठीचा वापर न करता कायमस्वरूपी मराठीत व्यवहार चालावेत, असे मत मोतेस बारदेसकर यांनी व्यक्त केले.

महत्त्वाचे ठराव: १. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: आगामी काळात होणारे मराठी साहित्य संमेलन बेळगावात व्हावे, अशी मागणी करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. २. एकजुटीचा निर्धार: राजू पाटील आणि रमेश माळवी यांनी मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देत ही यात्रा लोकचळवळ म्हणून यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीचे प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले, तर आभार सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी मानले. याप्रसंगी अशोक घगवे, शिवाजी हावळानाचे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सचिन दळवी, सागर कणबरकर यांसह युवा समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


