बेळगाव लाईव्ह : सीमा भागात सातत्याने मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचा येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बेळगाव परिसरातील सामाजिक सलोखा बिघडवून मराठी जनतेला लक्ष्य करणाऱ्या समाजकंटकांना वेळीच आवर घालावा, अन्यथा मराठी जनता त्यांना धडा शिकवण्यास समर्थ आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला. संघटनात्मक बांधणीसाठी सिद्धेश्वर मंदिर येथे आयोजित बैठकीत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना वक्त्यांनी सीमा भागातील सद्यस्थितीवर भाष्य केले.
रमाकांत कोडूंस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबिराचे फलक समाजकंटकांनी फाडल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अशा कृत्यांमुळे माणुसकीला काळीमा फासला जात असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे युवा नेते शुभम शेळके यांना पोलीस प्रशासनाकडून दिला जाणारा त्रास हा बेकायदेशीर असून या दडपशाहीचा सर्व सदस्यांनी एकमुखाने निषेध केला असे त्यांनी म्हटले.
मराठी भाषिकांनी आपल्या घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी कायम एकत्र राहिले पाहिजे, असे आवाहन वामनराव पाटील यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी एकीचे बळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. येळ्ळूर विभागाने सीमालढ्यात नेहमीच मोलाचे योगदान दिले असून भविष्यातही हाच जोम आणि उत्साह टिकवून ठेवण्याची गरज दुद्दापा बागेवाडी यांनी व्यक्त केली. येळ्ळूरवासियांची एकजूट हीच आपली ताकद असल्याचे दत्ता उघाडे यांनी नमूद केले.

समितीच्या बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समितीने विशेष पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी राजू पावले, सूरज गोरल आणि बी. एन. मजुकर यांची समयोचित भाषणे झाली.
या बैठकीस चांगदेव परीट, नेताजी गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट, प्रकाश पाटील, शिवाजी कदम, कृष्णा बिजगरकर, कृष्णा शहापूरकर, सतीश देसुरकर, तानाजी पाटील, नंदकुमार पाटील, भिमराव पुन्याणावर, नरेश मंगणाईक, जोतीबा परीट, राजू पाटील, आनंदा कंग्राळकर, रमेश धामनेकर, परशराम मालुचे यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




