बेळगाव लाईव्ह : १५७ व्या अधिवेशनात बुधवारचा दिवस प्रश्नोत्तरांचा कालावधी संपल्यानंतर संपूर्णपणे कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटक विभागातील ज्वलंत समस्यांवर विशेष चर्चा करण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे अशी माहिती कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली.
सुवर्णसौधमध्ये ८ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वी, उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटक भागातील ज्वलंत समस्यांवर १४५ व्या अधिवेशनात ६ तास ३५ मिनिटे चर्चा झाली होती, ज्यात १९ सदस्यांनी सहभाग घेतला होता. १५१ व्या अधिवेशनात १ तास ४० मिनिटे चर्चा झाली होती, ज्यात ६ सदस्यांनी भाग घेतला होता. तसेच, १५४ व्या अधिवेशनात ५ तास १२ मिनिटे चर्चा झाली, ज्यात ११ सदस्यांनी सहभाग घेतला होता. त्याच धर्तीवर, यावेळच्या अधिवेशनातही उत्तर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटक भागातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष संधी दिली जाईल.
या चर्चेत प्रामुख्याने कृष्णा अपर कालवा योजना, महादयी आणि कळसा-भांडुरा प्रकल्पांची अंमलबजावणी, वनजमिनींचे अतिक्रमण, पूरग्रस्तांचे प्रश्न व त्यांचे निराकरण, उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे निराकरण, तसेच रोजगार निर्मितीसाठी कृती योजना या विषयांवर चर्चा करण्याची संधी दिली जाईल.
१५७ व्या परिषद अधिवेशनासाठी १० दिवस उपवेशन दिवस म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. या अधिवेशनासाठी आतापर्यंत एकूण १६४९ प्रश्न प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ९६५ तारांकित आणि ६८४ अतारांकित प्रश्न आहेत. नियम ७२ अन्वये ११२ सूचना आणि नियम ३३० अन्वये ८४ सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत.
पहिल्या दिवशी, मागील अधिवेशनापासून दिवंगत झालेल्या मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयानुसार अन्य विषयांवरही चर्चा होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


