बेळगाव लाईव्ह : राज्यात फोफावलेला अंमली पदार्थांचा व्यापार आणि अवैध स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येवरून भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. कर्नाटकची अवस्था आता ‘उडता पंजाब’ सारखी होत असून सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकत असून गृहखाते माफियांचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यात पूर्णपणे निष्फळ ठरले आहे, असे विजयेंद्र यांनी म्हटले. पोलिसांवर सरकारचा वचक राहिला नसल्याने अमली पदार्थांची तस्करी खुलेआम सुरू असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हे सरकार केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठबळ देत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
अवैध स्थलांतरितांना घरकुलांचे वाटप करण्याच्या निर्णयावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. घुसखोरांना अशा प्रकारे सोयीसुविधा पुरवणे राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठे संकट ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसकडून देशविघातक शक्तींना मदत केली जात आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सरकारच्या गॅरंटी योजनांवर प्रहार करताना विजयेंद्र म्हणाले की, तिजोरी भरण्यासाठी आणि योजनांचा खर्च भागवण्यासाठी सरकार मद्यविक्रीला प्रोत्साहन देऊन राज्याला मद्यपींच्या गर्तेत ढकलत आहे. केवळ महसूल मिळवणे हेच या सरकारचे एकमेव उद्दिष्ट असून समाजहिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते सुभाष पाटील, गीता सुतार आणि संजय पाटील यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




