बेळगाव लाईव्ह : पर्यावरण आणि मनुष्य जातीच्या हितार्थ जगभरात झाडे वाचवण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली जात असताना बेळगावमध्ये मात्र झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. आता माजी मंत्री कै. बी. शंकरानंद यांचा पुतळा उभारण्यासाठी क्लब रोड येथील एका निरोगी, अनेक दशके जुन्या झाडावर कुऱ्हाड चालवली जात असल्यामुळे जाणकार नागरिकांसह वृक्षप्रेमीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरातील क्लब रोडचे नव्याने बी शंकरानंद मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रस्त्यावर चौकाच्या ठिकाणी शंकरानंद यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा उभारण्यासाठी येथील मोठ्या विस्ताराचे जुने झाड क्रूरपणे तोडण्यात येत आहे. शंकरानंद यांचा पुतळा उभा करण्याची गरज आहे मात्र त्यासाठी झाडाची कत्तल करू नये अन्यत्र पुतळा बसवावा अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक दशकांपासून सावली देण्याबरोबरच वातावरण स्वच्छ ठेवण्यास हातभार लावणाऱ्या तसेच परिसराचे सौंदर्य वाढवणाऱ्या या डेरेदार झाडाची कत्तल केली जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांसह वृक्षप्रेमीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच ज्यांच्या नावाने आता या रस्त्याचे नांव बदलण्यात आले आहे, त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यास काही हरकत नाही, परंतु त्यांचा पुतळा स्थापनेसाठी एक निरोगी, दशके जुने झाड तोडण्यामागील तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिथे विकास म्हणजे आपल्याकडील शिल्लक राहिलेले थोडे हिरवेगार आवरण नष्ट करणे हा असेल तर मग आपण कोणत्या विघातक दिशेने, कोणत्या किंमतीला?जात आहोत विचारण्याची वेळ आली आहे, असे मतही व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे बेळगावचे हित जपणाऱ्या जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांनी या वृक्षतोडीची गांभीर्याने दखल घेऊन क्लब रोड येथील संबंधित झाड सुरक्षित ठेवून बी. शंकरानंद यांचा पुतळा उभारण्याचा आदेश द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.




