बेळगाव लाईव्ह : डिजिटल व्यसनाला आळा घालण्यासाठी हलगा गावात राबविण्यात येत असलेल्या ‘रात्री ७ ते ९ स्क्रीन बंद’ या अभिनव उपक्रमाची तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मोबाईल, टीव्ही यापासून दोन तास दूर राहून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
गावात रात्री ७ वाजता भोंगा वाजवून ‘स्क्रीन बंद’ करण्याचा संदेश दिला जातो. यानंतर गावातील विद्यार्थी अभ्यासाला बसतात. कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावभर फिरून या उपक्रमाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. ७ ते ९ या वेळेत अभ्यास करणाऱ्या मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.
रात्री गावातील विविध गल्लीतून भेट देत विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरू आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मोबाईल व टीव्ही बंद ठेवून घराघरात अभ्यासाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या उपक्रमासाठी ग्राम पंचायत, शाळा सुधारणा समिती, पंच मंडळी तसेच ग्रामस्थांनी एकत्रितपणे जनजागृती केली आहे. गावभर घरोघरी फिरून पालकांना उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
डिजिटल व्यसनातून मुलांना बाहेर काढत अभ्यासाची गोडी निर्माण करणारा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. बेळगाव तालुक्यातील प्रत्येक गावात असा उपक्रम करायला हवा तरच आजच्या पिढीला डिजिटल व्यसनापासून दूर काढल्यासारखे होईल.




