बेळगाव लाईव्ह :वॉरंटी नसलेल्या बॅटरीसह मोटरसायकलची विक्री करून ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाने सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा. लि कंपनीसह त्यांच्या दोन वितरकांना दणका दिला असून त्यांनी संबंधित ग्राहकाला 35,000 रुपये नुकसान भरपाई देण्याबरोबरच त्याच्या खरेदी केलेल्या मोटरसायकलला नवी बॅटरी बदलून द्यावी, असा आदेश दिला आहे.
ग्राहक न्यायालयाच्या सदर आदेशामुळे नवी सुझुकी 125 एक्सेस खरेदी करणाऱ्या मारुती गल्ली बेळगाव येथील अभय प्रकाश कुलकर्णी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बेळगाव येथील न्यायालयावारात अभय कुलकर्णी यांनी बेळगाव लाईव्हला माहिती देताना सांगितले की, मी साल्सेट गोवा येथील कुंडे सुझुकी शोरूम मधून सुझुकी 125 एक्सेस मोटरसायकल खरेदी केली होती. माझ्या या मोटरसायकलचे सर्व्हिसिंग मी बेळगावच्या माणिकबाग सुझुकी येथे करून घेत होतो. खरेदी केल्यानंतर दोन महिन्यांनी मोटरसायकलच्या स्टार्टर मध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे मी माणिकबाग सुझुकीमध्ये गाडी दाखवली. तेथे एक्साइड कंपनीच्या बॅटरी तज्ञांकडून तपासणी केली असता गाडी नवीन घेतानाच तिच्यामध्ये वॉरंटी नसलेली बॅटरी बसवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
त्यावेळी माणिकबागवाल्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही जेथून मोटरसायकल खरेदी केलीत तेथूनच तुम्हाला नवी बॅटरी बदलून मिळेल. तेंव्हा मी गोव्यातील कुंडे सुझुकीकडे विचारणा केली असता. त्यांनी आपले हात झटकून माणिकबाग सुझुकीवाल्यांनी बॅटरी बदलली असावी असा आरोप केला.
या पद्धतीने समस्येचे निवारण करण्याऐवजी माझी इकडून तिकडे पळवापळवी करण्यात आली. तेव्हा मी सुझुकी इंडियाकडे मेलद्वारे बॅटरीसंदर्भात तक्रार केली असता त्यांच्याकडून देखील समाधानकारक प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजाने मला ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. आता ग्राहक न्यायालयाने माझ्या बाजूने निकाल दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशात 1) सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, नेल्सन मंडेला रोड, वसंत कुंज, नवी दिल्ली, 2) व्यवस्थापक कुंडे सुझुकी, नुवे साल्सेट गोवा आणि 3) व्यवस्थापक माणिकबाग, सुझुकी सर्व्हिसेस, धारवाड रोड बेळगाव यांनी सेवेत त्रुटी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांना केए 22 एचक्यू 7556 नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनाची बॅटरी केएस 288/23-24 इनव्हॉइस क्रमांक अंतर्गत दि. 29-02-2024 रोजी विकली गेली होती.
ही बॅटरी बदलण्याच्या तारखेपासून वॉरंटी कालावधीसह नवीन बॅटरीने बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बॅटरी बदलून देण्याबरोबरच तक्रारदाराला म्हणजे मला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 25,000 रुपये नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च भरून काढण्यासाठी 10,000 रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वरील रक्कम न्यायालयाच्या आदेशाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत तक्रारदाराला म्हणजे मला देण्यात यावी अन्यथा 25000 रुपये अधिक 10,000 रुपये अशा एकूण 35,000 रुपयांच्या रकमेवर या आदेशाच्या तारखेपासून ते अंमलबजावणी होईपर्यंत वार्षिक 9 टक्के दराने व्याज आकारले जाईल, असे नमूद असल्याचे अभय कुलकर्णी यांनी सांगितले.वकील सुधीर सक्रे यांनी कुलकर्णी यांच्या वतीने ग्राहक न्यायालयात बाजू मांडली




