belgaum

शाळकरी मुलांनी वर्गमित्राच्या मदतीसाठी उभारला निधी

0
587
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेतील ९४ विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमित्रासाठी एकजुटीचा अभूतपूर्व इतिहास रचला आहे. राष्ट्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू प्रेम यल्लप्पा बुरुड याला प्रवासासाठी पैशांची अडचण होती. ही बाब समजताच त्याच्या वर्गमित्रांनी अवघ्या २४ तासांत ५,६१२ रुपयांचा निधी गोळा करून मैत्रीचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

या निधीच्या माध्यमातून प्रेमचा कोईम्बतूर ते रांची आणि रांची ते उटी असा प्रवासाचा मार्ग सुखकर होणार आहे. एकजुटीने प्रयत्न केल्यास वयाचे बंधन आड येत नाही आणि मोठे ध्येय साध्य करता येते, हे या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

कावळेवाडी गावातील हा तरुण खेळाडू २४ जानेवारी २०२६ रोजी झारखंडमधील रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी त्याने ६० व्या कर्नाटक राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२५ मध्ये २ किमी धावण्याच्या शर्यतीत ५ मिनिटे ४३ सेकंदांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला होता.

 belgaum

प्रेम सध्या उटी येथील मद्रास रेजिमेंट सेंटरच्या ‘आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी’मध्ये नवव्या वर्गात क्रीडा कॅडेट म्हणून सराव करत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्याने अत्यंत जिद्दीने राज्य स्तरावर यश संपादन केले असून, आता त्याचे लक्ष्य राष्ट्रीय पदकावर आहे.

शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ‘टीम फेसबुक फ्रेंड्स सर्कल’च्या सहकार्यामुळे मुलांचा हा उपक्रम यशस्वी झाला आहे. आपल्या मित्रावरील निस्सीम प्रेम आणि एकीचे दर्शन घडवणारा या मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. कावळेवाडीच्या या छोट्या चॅम्पियन्सनी आपल्या गावाचे नाव अभिमानाने उंच केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.