बेळगाव लाईव्ह :मागील तीन ते चार वर्षापासून कंग्राळी खुर्द येथील एका रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडून निषेध व्यक्त केला. यावेळी वाहनांच्या रांगा आणि कोंडी निर्माण झाली होती. तातडीने रस्ता करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पहिला बस स्टॉप रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द येथील नागरिकांच्या समस्या वारंवार वाढत चालल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान रामदेव गल्ली येथील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी मागील तीन ते चार वर्षापासून येथील नागरिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून येत्या आठवड्याभरात कंग्राळी खुर्द येथील यात्रा आहे.
मात्र यात्रेपूर्वी संबंधित रस्ता करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंग्राळी खुर्द येथील मुख्य रस्त्यावर आंदोलन छेडून रास्ता रोको करण्यात आला. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. एपीएमसी कडून येणाऱ्या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती तर अलतगा या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनधारकांची ही मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान हे आंदोलन छेडल्यामुळे समस्या होत असली तरी नागरिकांनी मात्र आपला पावित्र्य कायम ठेवला होता. पहिला रस्ता करा नंतरच आंदोलन मागे घेऊ असा इशारा प्रशासनाला दिला. दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य यांनी नागरिकांशी चर्चा केली. तातडीने हा रस्ता करू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायतीने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप ही नागरिकांनी केला.
मागील चार वर्षापासून प्रशासन केवळ आश्वासनांची केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे यावेळी जर रस्ता झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तातडीने हा रस्ता करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांच्यासह ग्रामविकास अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या रस्त्याबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा करून हे आंदोलन मागे घेण्यात आले.



