ग्रामीण भागात मराठी शिक्षणाची मशाल पेटती ठेवणारी:व्याख्यानमाला

0
393
 belgaum

बेळगाव लाईव्ह :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन पोहोचावे, या उदात्त हेतूने गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेली कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमाला यंदा मण्णूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाला यावर्षी मातोश्री सौहार्द को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सहकार्य लाभले आहे.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रा. सौ. छाया अरविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमाणिकर व संयोजक आर. एम. चौगुले यांच्या शुभहस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्राचार्य अरविंद पाटील म्हणाले,
“विद्यार्थ्यांनो, उज्ज्वल भवितव्य सहज मिळत नाही. त्यासाठी संघर्षाला सोबतीला ठेवून सातत्याने मेहनत करावी लागते. शिस्त, कष्ट आणि चिकाटी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.”

यावेळी प्राचार्य पाटील यांनी आर. एम. चौगुले यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत गौरव केला. ते म्हणाले,
“कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ समाजऋणाच्या भावनेतून चौगुले सरांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक चळवळ उभी केली आहे. ही व्याख्यानमाला केवळ उपक्रम नसून ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारे प्रेरणास्थान आहे.”

गेल्या अकरा वर्षांपासून आर. एम. चौगुले हे बेळगावातील नामवंत, अनुभवी व विषयतज्ज्ञ शिक्षकांना ग्रामीण भागात आणून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित करत आहेत. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, अनेक विद्यार्थ्यांच्या यशामागे या व्याख्यानमालेचा मोठा वाटा आहे.

 belgaum

ग्रामीण विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करणे, योग्य अभ्यासदिशा देणे, परीक्षेची भीती कमी करून आत्मविश्वास वाढवणे तसेच स्वप्न पाहण्याची जिद्द जागवणे, ही या व्याख्यानमालेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

या उपक्रमामागील आर. एम. चौगुले मित्रमंडळ निस्वार्थ भावनेने कार्यरत असून, कोणतीही अपेक्षा न ठेवता संयोजन व नियोजनाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे ही व्याख्यानमाला सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व सकारात्मक ऊर्जा दिसून आली. “अशी व्याख्यानमाला आमच्यासाठी दिशा दाखवणारी आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

उद्घाटनप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक रवी तरळे, रामचंद्र कुद्रेमाणिकर, अनिल हेगडे, एन. के. कलकुंद्री, शंकर सांबरेकर, सागर कटगेनायर, भरमा चौगुले, शंकर आप्पुगोळे, नागेश चौगुले, मुख्याध्यापक वाय. के. नाईक, सौ. नावगेकर, शिंदे, सौ. ओऊळकर तसेच विज्ञान शिक्षक राक्षे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गुरुवर्य प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.

ही व्याख्यानमाला पुढील सलग पाच रविवार चालणार असून, दहावीच्या (मराठी माध्यम) विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक आर. एम. चौगुले यांनी केले आहे.

व्याख्यानमालेचा तपशील (इयत्ता १० वी – मराठी माध्यम)

तारीखविषयविषयतज्ज्ञ
21/12/2025मराठीसी. वाय. पाटील
28/12/2025कन्नडसंजीव कोस्ती
04/01/2026विज्ञानसौ. सविता पवार
11/01/2026सामाजिक शास्त्रइंद्रजीत मोरे
18/01/2026गणितपी. आर. पाटील
25/01/2026इंग्रजीसुनील लाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.