belgaum

अनगोळचे मालमत्ता महसूल पत्र उघडण्याची डीसींकडे मागणी

0
70
 belgaum

बेळगाव लाईव्ह :अनगोळ, बेळगाव येथील एसवाय क्र. 35, 35ए, 36बी, 38, 662, 661, 744, 750 मधील नावे शहर सर्वेक्षण उताऱ्यामध्ये नोंद करावीत आणि अनगोळ क्षेत्राचे मालमत्ता महसूल पत्र उघडावे, अशी मागणी अनगोळच्या संबंधित रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अनगोळच्या संबंधित रहिवाशांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.

यावेळी निवेदनातील मागणीसंदर्भात माजी नगरसेवक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थोडक्यात माहिती दिली. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी रोशन यांनी उपसंचालक भूमी अभिलेख (डीडीएलआर) यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती घेण्याद्वारे योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

 belgaum

बेळगाव तालुक्यातील अनगोळ गावातील एसवाय क्र. 35, 35ए, 36बी, 38, 662, 661, 744, 750 इत्यादी अस्तित्वात आहेत. हा परिसर गावठाण क्षेत्राशी जोडलेला असून तो झोपडपट्टी असलेला अविकसित असा आहे. सदर मालमत्तांची शहर सर्वेक्षण उताऱ्यामध्ये नावे नोंद करावी आणि अनगोळ क्षेत्राचे मालमत्ता महसूल पत्र (प्रॉपर्टी रेव्हेन्यू कार्ड) उघडावे अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आम्ही संबंधित सर्व सरकारी कार्यालयांशी संपर्क साधुनही त्याचा कांही उपयोग झालेला नाही.

वरील मालमत्तांना 1976 पूर्वीच एन.ए. मंजूरी मिळाली असली तरी सध्या संबंधित सरकारी अधिकारी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहशिलदार कार्यालयाकडे अधिकृत प्रत मागितली असता संबंधित अधिकारी त्यांच्या कार्यालयाकडे तशी कोणतीही कागदपत्रे नाहीत असे आम्हाला पत्राने कळवत आहेत.

हा संपूर्ण परिसर झोपडपट्टीचा असून आम्ही अनुसूचित जाती/जमाती, इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय लोक या भागात राहतो. आम्ही वरील एसवाय क्रमांकांची नोंद आधीच शहर सर्वेक्षण उताऱ्यात केली आहे आणि सीटीएस क्रमांकही मिळाले आहेत. संबंधित एसवाय क्रमांक एन.ए. वापरात रूपांतरित झाले आहेत. तसेच येथील रहिवाशी देखील नियमितपणे महानगरपालिकेचा कर भरत आहेत. सध्या येथील इमारती जीर्णावस्थेत असून त्यांचे पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे.

तथापी सीटीएस क्रमांकाशिवाय महानगरपालिका अधिकारी इमारत बांधकाम परवानगी देत ​​नाहीत. त्यामुळे आमच्यासाठी राखीव असलेल्या सरकारी सुविधांपासून आम्हाला वंचित रहावे लागत असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

तरी आपल्याला विनंती आहे की कृपया संबंधित अधिकाऱ्यांना मालमत्ता महसूल पत्र उघडण्याची सूचना करावी आणि आमचे नमूद केलेले सीटीएस क्रमांक सीटीएस उतारा आणि प्रॉपर्टी कार्डमध्ये प्रविष्ट करावेत, अशा आशयाचा तपशील निवेदनात म्हणून आहे. निवेदन सादर करतेवेळी तानाजी बाळेकुंद्री, अशोक हट्टीकर पुन्नाप्पा वाजंत्री, गोपाळ भजंत्री, योगेश सूर्यवंशी, लक्ष्मण वाजंत्री आदींसह अनगोळचे बरेच रहिवासी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.