‘या’साठी बेळगाव महापालिका सभागृह करावे बरखास्त -सुजित मुळगुंद

0
631
Sujit mulgund
 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टिळकवाडी, बेळगाव येथील पहिल्या रेल्वे गेटनजीक कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ‘कला भवन’ हे बहुउद्देशीय व्यापारी संकुल गेले 6 महिने धुळखात पडून राहिल्यामुळे बेळगाव महापालिका व सरकारचे कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे. याला संबंधित लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे सभागृह जबाबदार असल्यामुळे हे सभागृह सुपर सीड अर्थात बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंदी यांनी केली आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी वैयक्तिक व्हिडिओच्या माध्यमातून उपरोक्त मागणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडे केली आहे. मुळगुंद यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट जवळ शेकडो कोटी रुपये खर्चून कला भवन या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाची भव्य इमारत उभारण्यात आली आहे.

सदर इमारतीचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकहोळी यांच्यासह अन्य मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत सहा महिन्यापूर्वी उद्घाटन झाले आहे. तथापि हे व्यापारी संकुल सुरू करण्यासाठी त्यामधील गाळ्यांचा लिलाव करण्याच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात विलंब केला जात आहे. याला कारण बेळगाव महापालिकेतील जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असल्याचे समजते.

 belgaum
Sujit

सरकारने सदर व्यापारी संकुलाचा प्रकल्प जनहितार्थ आणि महापालिकेला चांगला महसूल मिळावा या उद्देशाने उभारला आहे तथापि त्याच्या परस्पर विरोधी कृती महापालिकेतील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे यांना त्या कारणास्तव निविदा प्रक्रिया यशस्वी होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात त्यांची ही कृती जनतेच्या आणि महापालिकेच्या हितासाठी असलेल्या विकास कामांमध्ये बाधा आणणारी असल्यामुळे केएमसी ॲक्ट अर्थात कर्नाटक पालिका कायद्याअंतर्गत बेळगाव महापालिकेतील विद्यमान सभागृह सुपर सीड अर्थात बरखास्त करण्यात यावे अशी अशी माझी विनंती आहे .

त्याचप्रमाणे सभागृह बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करून टिळकवाडीतील कलाभवनाची निविदा प्रक्रिया पार पडण्याद्वारे महापालिका लाभ मिळवून देण्याबरोबरच जनतेचे हितरक्षण केले जावे, अशी माझी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारला विनंती आहे. कारण कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला कलाभवनाचा टिळकवाडी येथील प्रकल्प कोणाच्यातरी स्वार्थासाठी धूळ खात पडता कामा नये. जनतेच्या सोयीसह हितासाठी तो प्रकल्प कार्यान्वित झाला पाहिजे, जेणेकरून महापालिका पर्यायाने सरकारला देखील लाभ होऊन त्याचा अन्य विकास कामे राबवण्यास मदत होईल, असे सामाजिक कार्यकर्ता सुजित मुळगुंद यांनी पुढे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.