बेळगाव लाईव्ह : “राज्य सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून ऊस उत्पादक भागात जमिनीचे आरोग्य आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर आमचा भर आहे. पृथ्वी ही जीवनाचा पाळणा आहे, त्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन ती वांझ होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.
बेळगाव तालुक्यातील हुदली गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगाव, बागलकोट, विजापूर, कलबुर्गी आणि मंड्या या पाच जिल्ह्यांतील ऊस उत्पादक क्षेत्रासाठी ‘जमीन आरोग्य आणि जल व्यवस्थापन’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मोह टाळण्याचा सल्ला दिला. खतांच्या अतिवापरामुळे जास्त उत्पादन मिळते हा गैरसमज असून, कृषी विभागाने नवीन वाणांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी म्हटले.
कृषी मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी यावेळी सांगितले की, ऊस उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कमी पाण्यात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ऊस तोडणी यंत्रांवर अनुदान देणारे कर्नाटक हे देशातील मॉडेल राज्य ठरले असून, यामुळे मजुरांची टंचाई दूर होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्य सरकारच्या योजनांमुळे कृषी क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे नमूद केले. परदेशांप्रमाणे आपल्याकडेही कमी जमिनीत जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र विकसित व्हावे, ही सरकारची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन सरकारी योजनांची माहिती द्यावी, अशी सूचना केली. तर साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी साखर निर्यातीतून मिळणाऱ्या फायद्याबाबत आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात मृदा आरोग्य पत्रिका (जमीन आरोग्य पत्रिका), ऊस रोपे आणि कृषी यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले. यावेळी सरकारी मुख्य प्रतोद अशोक पट्टण, आमदार बाबासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


