बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या शांताई विद्याधार संस्थेने एका साध्या पण प्रभावी उपक्रमाद्वारे, म्हणजेच शैक्षणिक मदतीसाठी वृत्तपत्रे विकून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी देण्याचे आपले उल्लेखनीय कार्य सुरू ठेवले आहे. गेल्या 12 वर्षांत संस्थेने संपूर्ण भारतातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली आहे.
ताजे उदाहरण म्हणजे शांताई विद्याधार संस्थेचे संस्थापक प्रमुख माजी महापौर विजय मोरे यांनी मंगळवारी उद्यमबागमधील एका खाजगी हॉटेलला भेट दिली असता, त्यांना श्रेयश वाघमारे नावाचा एक तरुण मुलगा अत्यंत समर्पण आणि नम्रतेने ग्राहकांना सेवा देताना दिसला. त्याचा प्रामाणिकपणा आणि आदरपूर्ण वागणकीमुळे मोरे यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले.
उत्सुकतेपोटी त्यांनी त्या मुलाची चौकशी केली असता त्यांना समजले की श्रेयश हा गोमटेश पीयू कॉलेजमध्ये शिकणारा एक हुशार विद्यार्थी असून आपल्या शिक्षणासाठी पैसे वाचवण्यासाठी अर्धवेळ वेटर म्हणून काम करतो. त्याच्या दृढनिश्चयाने प्रभावित होऊन माजी महापौर मोरे यांनी आपला चिरंजीव सामाजिक कार्यकर्ता ॲलन विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर शांताई विद्या आधार मंडळाच्या सदस्यांनी विनाविलंब श्रेयश वाघमारे याला मदत करण्याचा निर्णय घेतला.

निर्णयानुसार त्यांच्या एका पथकाने गोमटेश विद्यापीठाला भेट दिली. तसेच आवश्यक औपचारिकता पूर्ण करून श्रेयशसाठी शैक्षणिक मदतीची व्यवस्था केली. शांताई विद्या आधार संस्थेतर्फे ॲलन विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांनी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडे शैक्षणिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. श्रेयश एका एकल पालक कुटुंबातील असून त्याची आई, जी उद्यमबाग जवळ एक छोटा खाद्यपदार्थांचा स्टॉल चालवते, ती आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी धडपड करत आहे.
आता शांताई विद्या आधारकडून वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे वाघमारे कुटुंबाला मोठा दिलासा मिळण्याबरोबरच श्रेयश याला त्याच्या शैक्षणिक भवितव्याबद्दल नवी आशा निर्माण झाली आहे. शांताई विद्याधर संस्थेच्या दीर्घकाळापासूनच्या या शैक्षणिक बांधिलकीने समुदाय-आधारित उपक्रम पात्र विद्यार्थ्यांसाठी जीवन बदलणाऱ्या संधी कशा निर्माण करू शकतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.


