बेळगाव लाईव्ह : राकसकोप बसथांब्यापासून बिस्कीट महादेव मंदिरमार्गे रामघाट रोडवरील बुडा कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवणारी उपरोधिक पत्रके तातडीने हटवण्यात आली आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कधीही न दाखवलेली तत्परता, थेट प्रशासनाला आव्हान देणारी भित्तिपत्रके काढण्यात दाखवल्याने स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संतापजनक आश्चर्य व्यक्त केले आहे.
या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, सध्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे नाहक आर्थिक नुकसान होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे ‘या रस्त्यालाही कदाचित नेत्याची भेट हवी!’, ‘व्ही. आय. पी. भेट असेल तर रस्ता चमकेल, सामान्यांचे नशीब मात्र खड्यात!’ अशा आशयाची पत्रके सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी भिंतींवर लावून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
सदर भित्तिपत्रकाबाबत आज अनेक वृत्तपत्रे, समाज माध्यमे तसेच विविध माध्यमांवर हे वृत्त प्रकाशित झाले. प्रशासनाच्या उदासीनतेवर बोट ठेवणारे हे वृत्त त्वरित चर्चेत आले. मात्र, रस्त्याच्या कामासाठी एक दिवसही तत्परता न दाखवलेल्या प्रशासनाने, टीका करणारी पत्रके भिंतीवरून काढण्यात मात्र तत्काळ ‘ॲक्टिव्हनेस’ दाखवला.”जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असताना, रस्त्याचे काम करण्याची तत्परता न दाखवता, फक्त विरोधाचे फलक काढण्याची तत्परता दाखवणे, हे प्रशासनाच्या संतापजनक वृत्तीचे प्रतीक आहे,” अशा तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
हा रस्ता कॅन्टोन्मेंट (छावणी परिषद) हद्दीत येतो. कॅन्टोन्मेंट प्रशासन विकास आणि दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेकडे बोट दाखवते. महापालिका जबाबदारी झटकते, तर छावणी परिषदेकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. या प्रशासकीय गोंधळात जनता मात्र भरडली जात आहे.
संबंधित प्रशासनाने पुढील अपघात घडण्यापूर्वीच याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून तीव्रपणे होत आहे.


