बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतच्या रस्ता डांबराची वाहतूक करणाऱ्या वाहनातील डांबर पडून खडबडीत धोकादायक बनला असून त्याची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी मनोहर हुंदरे यांनी केली आहे.
अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतच्या रस्तावर डांबराची वाहतूक करणाऱ्या वाहनातील डांबर पडल्यामुळे सध्या तो ठीकठिकाणी खडबडीत झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी हा रस्ता गैरसोयीचा ठरत आहे.
खडबडीत रस्त्यावरून कसरत करत वाहने चालवताना दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. सदर माहिती देऊन मनोहर हुंदरे यांनी बेळगाव लाईव्हला सांगितले की, डांबर पडून खराब झालेला रस्ता आणि त्यात भर म्हणून सध्या उसाचा हंगाम सुरू असल्यामुळे या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वगैरे वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही वाहने आणि वाळू, माती, खडी वाहतूक करणारे टिप्पर सारखी अवजड वाहने रस्त्याच्या मधोमध चालवली जातात.
त्यामुळे कार, दुचाकी यासारख्या तुलनात्मक लहान वाहन चालकांना आपली वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत आहेत. गेल्या सुमारे दीड वर्षात या रस्त्यावर 4 -5 युवकांना अपघातग्रस्त होऊन आपला जीव गमवावा लागला आहे. एकंदर अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतचा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आता डांबर पडल्यामुळे ठिकठिकाणी हा रस्ता ओबडधोबड होऊन अधिकच धोकादायक बनला आहे.
तरी संबंधित खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब योग्य ती कार्यवाही करण्याद्वारे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा. तसेच टिप्पर वगैरे सारखे अवजड वाहन चालक दारू पिऊन वाहने हाकत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील या रस्त्याच्या ठिकाणी मालवाहू वाहन तपासणी मोहीम राबवून इतर वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनोहर हुंदरे यांनी शेवटी केली.


