बेळगाव लाईव्ह :हुक्केरीच्या ग्रेड -2 तहसीलदारावर सरकारने तात्काळ कारवाई करावी अन्यथा हिवाळी अधिवेशनाप्रसंगी विरोधी पक्ष नेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे.
बेळगाव येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हुक्केरीच्या ग्रेड -2 तहसीलदाराकडून वाल्मिकी समाजावर केला जात असलेला अन्याय हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारच्या निदर्शनास आणून दिली जाईल.
या तहसीलदाराकडून केवळ वाल्मिकी समाजच नव्हे, तर मागास आणि अनुसूचित जाती जमातीचे बनावट दाखले देऊन अहिंद लोकांवर अन्याय केला जात आहे. त्यासाठी मी जनता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हुक्केरी ग्रेड -2 तहसीलदारांच्या बाबतीत सरकार गांभीर्याने विचार करत नसून त्यांनी आपल्या वकिलाकडून फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या अहिंद नेते असल्यामुळे त्यांनी हुकेरी ग्रेड -2 तहसीलदारावर कारवाई करून आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा.
सदर बाब नुकतीच पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली आहे असे पुढे सांगून सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर ते विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या निदर्शनास आणून देऊन दि. 8 डिसेंबर रोजी सदनाच्या आत आणि दि. 19 डिसेंबर रोजी सदनाबाहेर आंदोलन छेडले जाईल, असे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.


