बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव दिला जावा या मागणीसह विविध अन्य मागण्यांसाठी भारतीय क्रांतिकारी किसान सेनेतर्फे आज शुक्रवारी सुवर्ण विधानसौध समोर धरणे सत्याग्रह करण्यात आला.
भारतीय क्रांतिकारी किसान सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. एन. कोकनुर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात बेळगाव जिल्हासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा या मागणीसह विविध 30 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर करण्यात आले.
आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना भारतीय क्रांतिकारी किसान सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कोकनुर यांनी शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव दिला जावा ही आमची प्रमुख मागणी असल्याचे सांगितले. या खेरीज कर्नाटकात शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त 7 तास वीज पुरवठा केला जात आहे इतका अल्पकाळ केला जाणारा वीज पुरवठा शेतीची कामे करण्यासाठी अपुरा पडत आहे.

त्यामुळे शेतीसाठी किमान 10 तास वीज पुरवठा केला जावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असल्यामुळे ही समस्या निकालात काढण्यासाठी शाश्वत उपाययोजना करावी अशी आमची राज्य व केंद्र सरकारकडे मागणी आहे. शेतकरी विविध प्रकारची शेतपिक घेण्यासाठी वर्ष -दोन वर्ष राबत असल्यामुळे त्याच्या पिकांना योग्य बाजार भाव दिला गेला पाहिजे.
उदाहरणार्थ शेजारील महाराष्ट्र राज्यात उसाचा दर प्रतिक्विंटल 4 ते 4.5 हजार रुपये दिला जात आहे. या उलट कर्नाटकमध्ये 3200 ते 3500 रुपये इतका प्रति टन दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तेंव्हा कर्नाटक सरकारने ऊसालाच नव्हे तर प्रत्येक पिकाला योग्य हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष एम. एन. कोकनुर असे सांगितले




