बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांचे विलीनीकरण आणि त्या बंद करण्याचा आदेश सरकारने मागे घ्यावा आणि केपीएस मॅग्नेट योजना तात्काळ रद्द करावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन कर्नाटक राज्य समितीने केली आहे.
ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एआयडीएसओ) कर्नाटक राज्य समितीतर्फे उपरोक्त मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी आज मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात एआयडीएसओ बेळगाव शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने सहभागी झाले होते.
हातात आपल्या मागण्यांचे फलक धरून या सर्वांनी जोरदार निदर्शने करण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक पब्लिक शाळांची केपीएस मॅग्नेट योजना या योजनेद्वारे हजारो सरकारी शाळा बंद किंवा विलीन करण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन विरोध केला असून त्यामुळे निर्माण होणारी प्रतिकूल परिस्थिती निवेदनात नमूद केली आहे.

त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये केपीएस मॅग्नेट योजनेच्या नावावर सरकारी शाळा विलीन अथवा बंद करण्याची प्रक्रिया तात्काळ मागे घेण्यात यावी. होंगनूर केपीएस शाळेमध्ये आसपासच्या 7 सरकारी शाळा विलीन करण्याचा आदेश ताबडतोब मागे घेण्यात यावा. थोडक्यात होंगनूर केपीएस शाळा विलीनीकरण प्रक्रिया रद्द करावी.
जाहिरातीसह कोणत्याही व्यापारी उद्देशासाठी सरकारी शाळांचा वापर केला जाऊ नये. प्रत्येक सरकारी शाळेमध्ये पुरेसे शिक्षक, मूलभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य वगैरे आवश्यक सर्व गोष्टींची पूर्तता केली जावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.




