बेळगाव लाईव्ह :कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील उदयोन्मुख बाल धावपटू कु. प्रेम यल्लप्पा बुरुड याने म्हैसूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित 60 व्या कर्नाटक राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप -2025 मधील 2 कि.मी. धावण्याच्या शर्यतीचे 5 मिनिटे 43 सेकंदांच्या प्रभावी वेळेसह अजिंक्यपद पटकावले आहे.
कावळेवाडी गावचा रहिवासी असलेला प्रेम यल्लप्पा बुरुड हा सध्या वेलिंग्टन, ऊटी येथील मद्रास रेजिमेंट (एमआरसी) सेंटरच्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीमध्ये 9.वी इयत्तेत शिकत आहे. आव्हानात्मक वैयक्तिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत असतानाही प्रेम याने उपरोक्त शर्यतीत उल्लेखनीय दृढनिश्चय आणि लवचिकता दाखवली. त्याच्या आजीला अलीकडेच पक्षाघाताचा तीव्र झटका आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
या कठीण काळात आपल्या आजीच्या इच्छेनुसार तिच्या सोबत राहण्यासाठी प्रेम सुट्टी घेऊन बेळगावला होता. या भावनिक क्षणांमध्येही प्रेम याने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेण्याची संधी साधली आणि त्यात विजय मिळवला.

त्याच्या या यशामुळे त्याची आजी, आई-वडील, कुटुंबातील सदस्य, कावळेवाडी गावातील ग्रामस्थ आणि जिल्ह्यातील हितचिंतकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. राज्यस्तरीय शर्यतीतील उत्कृष्ट कामगिरीनंतर कु. प्रेम यल्लप्पा बुरुड याची आता राष्ट्रीय स्तरावरील क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
प्रेमच्या या प्रवासाला आणि यशाला टीम फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि कावळेवाडी गावातील ग्रामस्थांचा खंबीर पाठिंबा असून ज्यांच्या प्रोत्साहनाची त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका आहे.




