बेळगाव लाईव्ह :पीएचडी पदवी न मिळाल्यामुळे नैराशीच्या भरात एका विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात घडली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव सुजाता बेंडे (वय 32) असे असल्याचे कळते. तिने विष घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. राणी चन्नम्मा विद्यापीठातील पीएचडीची विद्यार्थिनी असणाऱ्या सुजाता हिला उपचारासाठी बेळगावच्या बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या पदवीदान समारंभप्रसंगी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलगुरू त्यागराज, कुलसचिव संतोष कामेगौड आणि मार्गदर्शक केएलएन मूर्ती यांच्या विरुद्ध सुजाता हिला पीएचडी पदवीपासून डावलल्याचा आरोप आहे.
रायबाग प्रदेशाचे समग्र चारित्र्य या विषयावर 6 महिन्यापूर्वी आपला प्रबंध सादर करणारी पीएचडी विद्यार्थिनी सुजाता हिला टार्गेट करून जाणीवपूर्वक पदवी पासून वंचित ठेवण्यात आल्याचे कळते. पीडित सुजाता बेंडे हिनेदेखील त्याला दुजोरा दिला असून याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


