बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील शिरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य कृष्णा गुरव यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आमदार विठ्ठल हलगेकर यांचे खासगी स्वीय सहायक (पीए) चरकी यांच्यावर विकासकामांच्या निधीतून २५ टक्के कमिशन मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. गुरव यांनी पत्रकार परिषदेत मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप आणि पीए चरकी यांचा मोबाईल नंबरसुद्धा सादर केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा नीलम विजय मादार उपस्थित होत्या. यावेळी शिरोली ग्रामपंचायतीस फिफ्टी फायनान्स योजनेतून मंजूर झालेल्या २२ लाखांच्या विकास निधीतील कामे घेण्यासाठी २५ टक्के कमिशन देणे अनिवार्य असल्याचे आमदारांच्या पीए चरकी यांनी सांगितले. या एकूण कमिशनपैकी १० टक्के रक्कम स्वतःसाठी मागितल्याचा दावाही गुरव यांनी केला आहे.
सदस्य कृष्णा गुरव यांनी या प्रकरणावरून आमदार विठ्ठल हलगेकर यांना उद्देशून गंभीर इशारा देत “आपल्या पीएचा शिरोली ग्रामपंचायतीतील हस्तक्षेप त्वरित थांबवावा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही,” असे त्यांनी ठणकावले. तसेच, तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या कामात आमदार आणि त्यांच्या पीएंनी हस्तक्षेप करू नये, असेही ते म्हणाले. “आमदारांचे पीए सरकारी दवाखान्यात एका कर्मचाऱ्याने पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाईचा इशारा देतात, पण स्वतःच २५ टक्के कमिशन कसे मागू शकतात?” असा थेट सवाल गुरव यांनी उपस्थित केला.
या आरोपांवर आमदार विठ्ठल हलगेकर यांना विचारणा करण्यात आली असता, या वादाबाबत “मला काहीही माहिती नाही, ही त्यांच्या दोघांमधील बाब आहे,” असे सांगत त्यांनी या प्रकरणातून हात झटकले. दुसरीकडे, पीए चरकी यांनी मात्र “ऑडिओतील आवाज माझा नाही,” असा दावा करत आरोप फेटाळून लावला आहे.
कृष्णा गुरव यांनी आपली ऑडिओ क्लिप आणि प्रतिक्रिया जाहीर करत “यातील खरे-खोटे जनतेनेच ठरवावे,” असे आवाहन केले आहे. कमिशनच्या या गंभीर आरोपामुळे शिरोली आणि संपूर्ण खानापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय क्षेत्रात याची जोरदार चर्चा सुरू आहे.


