बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधान परिषदेत आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी वायव्य परिवहन महामंडळाचे नाव बदलून ‘राणी चन्नम्मा रस्ते परिवहन महामंडळ’ असे ठेवण्याचा विषय शून्य प्रहरात उपस्थित केला.
कित्तूर कर्नाटक विभागाची ही जुनी मागणी असून, नामकरणाला होणारा विलंब स्थानिक लोकांमध्ये असंतोष वाढवत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
नामकरणाचा ठराव महामंडळाच्या प्रशासकीय मंडळाने मंजूर करून सरकारकडे पाठवला आहे. मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्यात सरकार दिरंगाई करत असल्याबद्दल हट्टीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली.
हट्टीहोळी यांनी सांगितले की, ‘कित्तूर कर्नाटक’ किंवा ‘कित्तूर राणी चन्नम्मा’ असे नामकरण केल्यास त्याचे संक्षिप्त रूप ‘केकेआरटीसी’ होते, ज्यामुळे कल्याण कर्नाटक परिवहन महामंडळाच्या नावाशी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा गोंधळ टाळण्यासाठी ‘राणी चन्नम्मा रस्ते परिवहन महामंडळ’ हे नाव निश्चित करण्यात आले आहे. या विषयावर त्वरित निर्णय घेऊन नामकरणाला अंतिम मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली.
यावर सभागृहाचे नेते तथा मंत्री बोसराजू यांनी, संबंधित मंत्र्यांकडून या मागणीवर उत्तर दिले जाईल, असे आश्वासन दिले.




