बेळगाव लाईव्ह :आजच्या 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाचा स्वागत सोहळा शहर परिसरात सुरळीत पार पडावा यासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत, अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.
आजच्या थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या आवारात ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे म्हणाले की, 31 डिसेंबरच्या सायंकाळी सर्व नागरिक नववर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याच्या मन:स्थितीत असतात. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांची नुकतीच एक बैठक घेऊन आम्ही त्यांना आज 31 डिसेंबरच्या रात्री घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजनांबद्दल सूचना दिल्या आहेत. याखेरीज कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात विशेष करून संवेदनशील भागात सततच्या गस्तीसह कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज रात्री पोलीस कॉन्स्टेबल पासून मी स्वतः कमिशनरपर्यंत आम्ही सर्वजण गस्तीवर असणार आहोत.
याखेरीस शहर परिसरात मोठ्या प्रमाणात केएसआरपी, सीएआर आणि गृह रक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून 10 हजार रुपये दंड केला जाईल. यासाठी पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील सर्व पोलीस ठाण्यांना अल्को ब्रेथ अनालायझर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. याबरोबरच आमचे जे अँटी स्टॅबिंग स्क्वाड आहे ते हँड हेल्ड मेटल डिटेक्टरसह चाकू, सुरे वगैरे प्राणघातक शस्त्रे स्वतःसोबत घेऊन वावरणाऱ्यांच्या मागावर राहील. जीवघेणी शस्त्रे ज्यांच्याजवळ सापडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. एकंदर जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत, अशी माहिती देऊन नववर्ष समस्त शहरवासीयांना सुरक्षित जावो, अशा शुभेच्छा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिल्या.
थर्टी फर्स्टनिमित्त आज ‘अशा’ प्रतिबंधात्मक उपाययोजना
आजच्या 31 डिसेंबर नववर्ष स्वागत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या असून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्याची माहिती देण्यात आली आहे.
बेळगाव पोलीस प्रशासनाकडून पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू असतील. 1) सुरक्षा व्यवस्था : नवीन वर्षाच्या सुरक्षा कर्तव्यासाठी पुढील प्रमाणे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) -4, पोलीस निरीक्षक (पीआय) -24, पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) -34, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) -89, सिव्हिल पोलीस हेड कॉन्स्टेबल /सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल (सीएचसी/सीपीसी) -660 होमगार्ड -300 सीएआर -7 केएसआरपी -3.

प्रमुख अंमलबजावणी आणि सुरक्षा उपायांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. : 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणे, सीट बेल्टशिवाय वाहन चालवणे आणि हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मद्यपान करून वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड आकारला जाईल. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्यात येतील. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, बॉडी-वर्न कॅमेरे आणि ड्रोनद्वारे पाळत वाढवण्यात येईल.
2) हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसाठी सूचना : हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसोबत गेल्या दि. 26 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या आधारे पुढील सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलांना दारूची विक्री किंवा सेवा देण्यास सक्त मनाई करावी. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये किंवा खाद्यपदार्थ वगैरेंसाठी त्यांची ऑर्डर घेऊ नये. विशेषतः ज्या ठिकाणी फटाके वापरले जातात, त्या ठिकाणी आगीपासून संरक्षणाची पुरेशी व्यवस्था सुनिश्चित करावी. सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसणारे प्रवेश (एन्ट्री) आणि बाहेर पडण्याचे (एक्झिट) फलक लावावेत. कोणतीही अनुचित किंवा किरकोळ घटना घडल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी किंवा 112 क्रमांक डायल करावा. बेळगाव शहरात नवीन वर्षाचा उत्सव शांततापूर्ण आणि सुरक्षित साजरा व्हावा यासाठी सर्वसामान्य जनता, हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.




