बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा म्हणजे ‘ओल्ड मॅन’चे दहन. यंदा या परंपरेने अधिक व्यापक रूप धारण केले असून, कॅम्प भागातील खानापूर रोड ‘ओल्ड मॅन’च्या विविध प्रतिकृतींनी गजबजून गेला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक कलाकारांनी कल्पकता लढवत साध्या पुतळ्यांना चक्क ‘धुरंधर’ आणि ‘डॉन’ लूक दिला आहे. ७ फुटी उंचीच्या आणि रुबाबदार लूक असलेल्या ओल्ड मॅनची किंमत ४ हजार रुपयांच्या घरात असून, छोटे पुतळे १२ हजार रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
बेळगावच्या कॅम्प भागातील खानापूर रोड सध्या ३१ डिसेंबरच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून, या ठिकाणी ‘ओल्ड मॅन’ तयार करण्याची कारागिरांची लगबग शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या वर्षी बाजारपेठेत अक्षय खन्ना स्टाईल आणि ‘धुरंधर’ नावाच्या ओल्ड मॅनची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ७ फूट उंचीच्या प्रतिकृती साधारण ४ हजार रुपयांना उपलब्ध असून, छोट्या प्रतिकृती १२०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदा कॅम्पमधील गवळी गल्ली आणि जीजीवायएम बॉईज ग्रुपने चक्क २५ फुटी उंच भव्य ओल्ड मॅन साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यंदाच्या प्रदर्शनात ‘विकिंग्स’ वेब सीरिजमधील ‘द सीअर’ या पात्रावर आधारित ओल्ड मॅन आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सीरिजमधील त्या पात्राप्रमाणेच विद्रूप चेहरा, डोळ्यांवर पट्टी आणि विशिष्ट बसण्याची पद्धत या पुतळ्याला देण्यात आली आहे. हे रहस्यमय रूप पाहण्यासाठी खानापूर रोडवर सोशल मीडिया प्रेमींची आणि तरुणांची मोठी गर्दी होत आहे. जुन्या वर्षाला निरोप देताना या ‘ओल्ड मॅन’चे दहन करण्याची परंपरा असल्याने, बेळगावसह गोवा परिसरातूनही ग्राहक या पुतळ्यांच्या खरेदीसाठी येत आहेत.
हे पुतळे तयार करण्यासाठी भुसा, सुतळी, प्लास्टिकची पोती, पुठ्ठा, गोटिव पेपर आणि खळ यांसारख्या साहित्याचा वापर केला जातो. सेंट झेवियर्स स्कूल जवळ आणि खानापूर रोडवरील मोकळ्या जागांवर कारागिरांनी आपल्या कलाकृती मांडल्या आहेत. दरवर्षी काहीतरी वेगळे देण्याच्या प्रयत्नात यंदा काही हौशी ग्रुप्सनी ओल्ड मॅनसोबत ‘ओल्ड लेडी’च्या प्रतिकृतीही तयार केल्या आहेत. ३० आणि ३१ डिसेंबरला या भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असून, बेळगावची ही आगळीवेगळी परंपरा अधिकच व्यापक होताना दिसत आहे.




