बेळगाव लाईव्ह :बेळगाव रेल्वे स्थानकाचे नांव ‘डॉ. शिवबसव महाप्रभू बेळगाव रेल्वे स्टेशन’ असे ठेवण्यात यावे, अशी औपचारिक विनंती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे.
खासदार शेट्टर यांनी दिल्लीतील नवीन संसद भवनात रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन लवकरात लवकर बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नामांतरास मंजुरी देण्याचा आग्रह धरला. कर्नाटक सरकारने हा प्रस्ताव आधीच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला असून रेल्वे मंत्रालयानेही या विषयावर आपले मत मांडले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या विनंतीला रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून बेळगाव रहिवाशांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीचा अनुकूल विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार शेट्टर यांनी सांगितले.
रेल्वे मंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान खासदारांनी बेळगाव-बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची सुटण्याची वेळ सकाळी 5:20 वरून सकाळी 6:15 पर्यंत सुधारित करण्याच्या सार्वजनिक विनंत्याही मंत्र्यांसमोर मांडल्या. तेव्हा रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मंत्रालय प्रवाशांच्या सोयीसाठी या बदलाची तपासणी करेल, असे सांगितले.
पुढे खासदार शेट्टर यांनी बेंगलोर-बेळगाव-मुंबई मार्गावर सुपरफास्ट ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी केली. या चर्चेमध्ये लोकपुर-रामदुर्ग-सौंदत्ती-धारवाड यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित सर्वेक्षणाचाही समावेश करण्यात आला होता. त्याला मंत्र्यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
या मुद्द्यांवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्याशीही आपण चर्चा केली असल्याचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले.



