बेळगाव लाईव्ह : गृह लक्ष्मी योजनेच्या निधीच्या गैरवापराचा आरोप करत महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरात आंदोलन छेडण्यात आले.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकामध्ये जमलेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करून गृहलक्ष्मी निधीच्या गैरवापराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलकांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आणि राज्य सरकारच्या हमी योजनांचा भाग असलेल्या 5000 कोटी रुपयांच्या गृह लक्ष्मी योजनेबाबत महिलांची फसवणूक केल्याचा आरोप केला.
मंत्री हेब्बाळकर अधिकाऱ्यांवर दोष ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे. तसेच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलन स्थळी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना एका महिला भाजप नेत्यांनी सांगितले की, राज्यातील काँग्रेस सरकार खरंतर गॅरंटी योजनांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करत आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून सरकारने तब्बल 5000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील कुटुंबप्रमुख महिलांना देण्यात येणारे मानधन गेल्या दोन महिन्यात मिळालेले नाही. गेल्या फेब्रुवारी व मार्च महिन्यातील या या थकीत मानधनाचा आकडा तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक असून ते महिलांच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाही.

या संदर्भात आमच्या नेत्यांनी विधानसभेत महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रश्न विचारला असता. ऑगस्टमध्ये आम्ही महिलांच्या खात्यावर जमा पैसे जमा केले आहेत फेब्रुवारी आणि मार्चचे देखील त्यामध्येच आहेत असे उत्तर देऊन मंत्र्यांनी वाद घातला. मात्र पुराव्यासह फेब्रुवारी व मार्च मधील महिलांचे पैसे मिळाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता तीन दिवसानंतर महिला व बालकल्याण मंत्री आपली चूक मान्य करून त्या दोन महिन्यांचे पैसे आम्ही खात्यावर जमा केले नाहीत याची कबुली देतात. यावेळी क्षमा मागण्याची त्यांची पद्धत ही सभागृहाची दिशाभूल करणारी होती. मंत्री हेब्बाळकर स्वतः महिला असून या पद्धतीने राज्यातील महिलांवर अन्याय करत असतील तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुळात त्या सर्वप्रथम त्यांच्या मंत्रिपदावरच अन्याय करत आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी समजून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर ते लगेच जमा केले जातील असे आश्वासन दिले आहे.
तथापी अद्याप पर्यंतची पूर्तता झालेली नाही. दुसरी गोष्ट मंत्र्यांनी फक्त क्षमा मागून हा प्रश्न सुटत नाही, तर महिलांचे दोन महिन्यांचे 5000 कोटी रुपये गेले कुठे? कोणाच्या खात्यावर गेले? या पैशाचा कुठे विनियोग केला गेला? याची तपशीलवार माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आवश्यक कागदपत्रांसहित दिली पाहिजे. फक्त क्षमा मागून चालणार नाही, असे त्या महिला नेत्याने स्पष्ट केले.




