बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरानजीकच्या मार्कंडेय नदीपात्रात मृत जनावरे फेकण्यात आल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येची गांभीर्याने दखल घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आज सकाळी क्रेनच्या सहाय्याने पात्रातील जनावरांची कलेवर बाहेर काढून नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरानजीकच्या मार्कंडेय नदीपात्रामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांत सहा डुक्करं, दोन मेंढ्या आणि दोन वासरांचे मृतदेह फेकून देण्यात आले होते. हे मृतदेह पाण्यात कुजून परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. या संदर्भातील तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तात्काळ मृत जनावरे बाहेर काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा आदेश दिला होता.
त्यानुसार आज सोमवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने नदीपात्रातील जनावरांचे सडलेले मृतदेह बाहेर काढून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या कार्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर आणि राजू टक्केकर या सामाजिक कार्यकर्त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहकार्य लाभले.
राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू पद्मप्रसाद हुली हा स्वत: जनावरं बाहेर काढण्यासाठी नदीत उतरला होता. मृत जनावरे बाहेर काढल्यानंतर त्यांना पुरण्यासाठी होनगा गावातील प्रमुखांनी उपरोक्त सामाजिक कार्यकर्त्यांना मदत केली. याप्रसंगी पंचायत विकास अधिकारी गंगादर नाईक ग्रा. पं. अध्यक्ष जयवंत धुदुम, गजानन गव्हाणे आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकारी रोशन यांनी मार्कंडेय नदीपात्रात जनावरांचे मृतदेह टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
बेळगावमधील मार्कंडेय नदी खानापूर तालुक्यातील बैलूर येथून सुरू होते, बेळगाव शहराच्या पश्चिमेला वाहते, पुढे ती गोडचीनमलकी धबधबा बनवते आणि गोकाकजवळ घटप्रभा नदीच्या संगमाला मिळते. मोठ्या नदीला मिळण्यापूर्वी बेळगाव जिल्ह्यात ही नदी एकूण 66 कि.मी. अंतराचा प्रवास करते.


