बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने राजहंसगड, नंदिहळ्ळी आणि गर्लगुंजी परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी रात्री राजहंसगड ते नंदिहळ्ळी रस्त्यावर नागरिकांना बिबट्या स्पष्टपणे दिसल्याने या भागातील रहिवासी धास्तावले आहेत.
बिबट्या सातत्याने राजहंसगड, नंदिहळ्ळी, आणि गर्लगुंजी परिसरात वावरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. हा परिसर घनदाट वनराईने वेढलेला असल्याने बिबट्याचा येथे कायम संचार असतो. राजहंसगड परिसरामध्ये मोरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे मोरांची शिकार करण्यासाठीच बिबट्या या भागात आला असावा, असा तर्क स्थानिक नागरिक आणि वन अधिकाऱ्यांकडून लावला जात आहे.
दरम्यान, बिबट्या दिसल्याच्या घटनेची माहिती मिळताच बेळगाव आणि खानापूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित नंदिहळ्ळी आणि गर्लगुंजी परिसराला भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि एकटे न फिरण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
मानवी वस्ती आणि वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष या घटनेननंतर पुन्हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, जंगलतोड आणि मानवी अतिक्रमणामुळे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात शहरांजवळच्या किंवा थेट मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत. बिबट्या, हत्ती किंवा अन्य वन्यजीवांचा वाढलेला वावर केवळ शेतीचे नुकसान करत नाही, तर मानवी जीवालाही धोका निर्माण करत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणे आणि वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.





