बेळगाव लाईव्ह : रायबाग तालुक्यातील कुडची शहराला नवीन तालुका केंद्र म्हणून घोषित करावे, या प्रमुख मागणीसाठी कुडची तालुका कृती समितीच्या वतीने आज भव्य आंदोलन छेडण्यात आले. कुडची आणि आसपासच्या २० हून अधिक गावांमधील प्रमुख नेते आणि हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
शहरातील प्रवासी निवासस्थानापासून निघालेला हा विशाल मोर्चा प्रमुख रस्त्यांवरून फिरत मसाहेबा चौकात पोहोचला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
कुडची शहराची लोकसंख्या सध्या ५० हजारांहून अधिक आहे. तसेच तालुका केंद्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व भौगोलिक आणि प्रशासकीय सुविधा येथे उपलब्ध असल्याने, हे शहर तालुक्याच्या दर्जासाठी सर्वार्थाने पात्र आहे. कुडचीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास परिसरातील गावकऱ्यांचे सरकारी कामांसाठी दूर रायबागला जाण्याचे कष्ट वाचणार आहेत.
सरकारने या मागणीची त्वरित दखल घेऊन कुडचीला तालुका म्हणून घोषित करावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास, आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कृती समितीच्या नेत्यांनी यावेळी दिला.

