बेळगाव : कर्नाटक राज्य पाणीपुरवठा कर्मचारी महासंघाच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आले. डिसेंबरअखेरपर्यंत थेट वेतन व थेट भरतीसह अन्य मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास, जानेवारी महिन्यात बंगळुरू येथील फ्रीडम पार्कमध्ये बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महासंघाने दिला.
या महिन्यात सुमारे सहा हजार पाणीपुरवठा कर्मचारी सुवर्णसौध येथे भव्य आंदोलनासाठी एकत्र आले होते. त्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री रहिम खान यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन थेट वेतन (निरपेक्ष पगार) आणि थेट भरतीबाबत अधिवेशनात निर्णय घेतला जाईल, अशी ठाम हमी दिली होती. मात्र अधिवेशन संपूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
महासंघाच्या वतीने कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ही मागणीही अद्याप मान्य झालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “अशा परिस्थितीत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, सदलगा परिसरातील काही कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून वेतन मिळालेले नाही. राज्यातील अनेक भागांत कर्मचाऱ्यांना आठ, सहा किंवा पाच महिने वेतन थकवण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणीपुरवठा कर्मचारी ही मूलभूत सेवा देणारी यंत्रणा असून अनेक कर्मचारी २५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. तरीही आजही त्यांना एजन्सी व कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत आहे. कंत्राटदारांकडून मानसिक त्रास, शिवीगाळ तसेच वेतनाबाबत विचारणा केल्यास कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे गंभीर आरोप महासंघाने केले.
आंदोलनादरम्यान मंत्री जमीर अहमद यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. जमीर अहमद यांच्याबाबत कर्मचाऱ्यांना आजही विश्वास असून त्यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
डिसेंबर महिन्यातच थेट वेतन आणि थेट भरतीचा निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारीत बेमुदत संप अटळ असल्याचे महासंघाने स्पष्ट केले. आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी आंदोलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगदान दिल्याबद्दल बेळगाव जिल्हाध्यक्ष शानूर काशप्पा यांचे विशेष आभार मानण्यात आले. त्यांनी सुवर्णसौध येथे रोज उपस्थित राहून आंदोलनाची जबाबदारी सांभाळली. तसेच राज्य कार्यदर्शी कुणिगल कृष्णा कोडा यांनी सलग पाच दिवस बेळगावात थांबून मंत्र्यांच्या भेटीसाठी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.
दरम्यान, सदलगा येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरच वेतन देण्याचे आश्वासन मिळाल्याचे महासंघाने सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे गरीबांचे मुख्यमंत्री असून त्यांनी यापूर्वी अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केले आहे. त्याच धर्तीवर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनाही थेट वेतन व थेट भरती लागू करावी, अशी जोरदार मागणी महासंघाच्या वतीने करण्यात आली.


