बेळगाव लाईव्ह : भारतीय लष्कराचा अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘कमांडो कोर्स’ बेळगाव येथील ‘ज्युनिअर लीडर्स विंग’मध्ये २५ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाला.
या प्रशिक्षणात भारतीय लष्कराच्या जवानांसह मित्र राष्ट्रांमधील १६ अधिकारी आणि ५ अराजपत्रित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत खडतर शारीरिक आणि मानसिक चाचण्यांनंतर हे प्रशिक्षण पूर्ण झाले.
‘जेएल विंग’चे कमांडर मेजर जनरल राकेश मनोचा यांनी प्रशिक्षार्थींना संबोधित केले आणि गुणवंतांचा गौरव केला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणादरम्यान दाखवलेल्या शिस्तीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. या कोर्समध्ये ‘राजपूत रेजिमेंट’चे लेफ्टनंट जय लांबा यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून बहुमान मिळाला, तर ‘नागा रेजिमेंट’चे एल/एनके जीवन सिंह कार्की यांना सर्वोत्कृष्ट एनसीओ प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले.
मित्र राष्ट्रांमधून आलेल्या प्रशिक्षणार्थींमध्ये नेपाळ लष्कराचे लेफ्टनंट सुदीप खडका यांनी सर्वोत्कृष्ट अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून बाजी मारली. तसेच नामिबियाचे कॉर्पोरल इव्हॅलिस्टस बॉयसेन यांना सर्वोत्कृष्ट एनसीओ प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.
“अत्यंत खडतर आणि शारीरिक-मानसिक आव्हानांनी भरलेला हा कोर्स पूर्ण करणे अभिमानास्पद आहे.” असे मेजर जनरल राकेश मनोचा यांनी आपल्या भाषणात म्हटले.




