बेळगाव लाईव्ह : बेळगावचा होतकरू युवा धावपटू प्रेम यल्लप्पा बुरुड 60 व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री अजिंक्यपद शर्यतीत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार असून त्याला
एक्सपर्ट व्हॉल्व्ह्स अँड इक्विपमेंट्स प्रा. लि., उद्योगबाग, बेळगावचे अध्यक्ष विनायक लोकूर याचे 10,000 रुपयांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
एक्सपर्ट व्हॉल्व्ह्स अँड इक्विपमेंट्स कंपनीचे अध्यक्ष विनायक लोकूर यांनी प्रेम यल्लप्पा बुरुड याच्या क्रीडा कारकिर्दीस संपूर्ण पाठबळ देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रांची (झारखंड) येथे 24 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या 60 वी राष्ट्रीय क्रॉस कंट्री अजिंक्यपद शर्यत होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रेमचे प्रायोजकत्व स्वीकारताना लोकूर यांनी 21 जानेवारी 2026 रोजीच्या त्याच्या कोईमतुर ते रांची 10,000 रु. इतक्या विमान प्रवास खर्चाची जबाबदारी उचलली आहे.
प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत प्रेम यल्लप्पा बुरुड अभिमानाने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी, म्हैसूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित 60 वी कर्नाटक राज्य क्रॉस कंट्री अजिंक्यपद शर्यत 2025 मध्ये प्रेम हा 2 कि.मी. धावण्याच्या शर्यतीत 5 मिनिटे 43 सेकंद असा उत्कृष्ट वेळ नोंदवत प्रथम क्रमांकासह राज्य विजेता ठरला होता.
प्रेम बुरुड हा कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) गावचा रहिवासी आहे. तो सध्या वेलिंग्टन, उटी येथील आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, मद्रास रेजिमेंट सेंटर (एमआरसी) येथे इयत्ता 9 वीत शिक्षण घेत असून क्रीडा छात्र आहे.

डिसेंबर 2025 मध्ये प्रेमच्या आजीला गंभीर पक्षाघाताचा झटका आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्यावर घरी उपचार सुरू आहेत. या कठीण काळात आजीची त्याला भेटण्याची मनापासून इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेमने रजा घेतली होती. भावनिक तणाव असूनही प्रेमने अपार जिद्द आणि खेळाप्रती निष्ठा दाखवत राज्य स्पर्धा न चुकवता विजय मिळवला. या यशामुळे त्याने आपल्या आजी, पालक, गाव आणि संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.
त्याच्या या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्याला आता राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करण्यासाठी तो जोमाने तयारीला लागला आहे. टीम फेसबुक फ्रेंड्स सर्कलने (एफएफसी) प्रेमच्या रांची प्रवासासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या विनंतीवरून उद्योजक विनायक लोकूर यांनी त्वरित या युवा खेळाडूस मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
हुशार विद्यार्थी व खेळाडूंना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांची मेहनत आणि समर्पण पुढील पिढीस प्रेरणा देते असे स्पष्ट करून विनायक लोकरे यांनी प्रेम आणि त्याच्या वडिलांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले. तसेच एक्सपर्ट व्हॉल्व्ह्स अँड इक्विपमेंट्स प्रा. लि. ही संस्था अशा गुणवान व कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी राहील, असे आश्वासन दिले.




