बेळगाव लाईव्ह : रस्त्यावर किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या दिव्यांगांकडून भु-भाडे वसूल करू नये, अशी सक्त सूचना असताना एका दिव्यांग विक्रेत्याकडून जबरदस्तीने अवैध भु-भाडे वसूल केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार सेठ व महापौर पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर भरून कान उघडणी केल्याची घटना आज मंगळवारी महापालिकेत घडली.
याबाबतची माहिती अशी की, मारुती सिद्धप्पा कलीगार हा 42 वर्षाचा दिव्यांग इसम शहरातील मेणसे गल्ली येथे रस्त्यावर बसून कपड्यांची किरकोळ विक्री करण्याचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडून महापालिकेतच्या ठेकेदाराकडून दररोज 20 रुपये वसुली केले जातात.
नियमानुसार रस्त्यावरील अपंग किंवा दिव्यांग विक्रेत्यांकडून महापालिकेला भू-भाडे वसूल करता येत नाही. तथापि हा नियम डावलून दिव्यांग मारुती याच्याकडून ठेकेदाराचे कर्मचारी जबरदस्तीने भाडे वसूल करण्याबरोबरच त्याला रस्त्यावरून हाकलण्याची धमकी देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या मारुती याने आज अखेर चक्क महापालिका कार्यालय गाठले आणि तेथील स्वागत कक्षात तो व्यथित होऊन रडत बसला होता.
“सरकारी काम आणि सहा महिने थांब”, अशी म्हण सगळीकडे आहे, बेळगावही त्याला अपवाद नाही. मात्र अशा परिस्थितीत महापालिकेत तक्रार करून मदत मागण्यासाठी एक दिव्यांग बाहेर रडत बसला असल्याची माहिती महापालिका सभागृहात बैठकीमध्ये व्यस्त असलेल्या आमदार आसिफ राजू शेठ, महापौर मंगेश पवार आणि महापालिका आयुक्त कार्तिकी एम. यांना मिळताच त्यांनी बाहेर धाव घेत माणुसकी दाखवत मारुती याची आस्थेने विचारपूस केली आणि मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यानंतर महापालिका बैठकीत आमदार असिफ सेठ आणि महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेऊन कान उघडणी केली. यावेळी एका दिव्यांग विक्रेत्याकडून दररोज 20 रुपये प्रमाण जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्या ठेकेदाराबद्दल बैठकीला उपस्थित नगरसेवकांमध्ये देखील तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
पोटासाठी रस्त्यावर बसून किरकोळ साहित्याची विक्री करण्याद्वारे इनमीन कमावणाऱ्या दिव्यांगांकडून या पद्धतीने पैसे वसुली झाल्यास तो कमावणार काय? आम्ही खाणार काय? असा सवाल आमदारांनी केला. तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. सदर मागणीची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्त कार्तिकी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी सांगितले की, रस्त्यावर बसून किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या दिव्यांगांकडून भू-भाडे वसुली केले जाऊ नये अशी सक्त सूचना यापूर्वीच अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तथापि अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला तशी कल्पना दिली आहे की नाही? हे माहीत नाही.तथापी आज आलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पुढील काळात ठेकेदाराच्या निविदेमध्ये देखील सुधारणा केली जाईल. त्यामध्ये रस्त्यावरील दिव्यांग विक्रे
त्यांकडून भु-भाडे वसूल केले जाऊ नये हे स्पष्टपणे नमूद केले जाईल असे सांगून दिव्यांग मारुती कलीगार याच्यावर अन्याय करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाईल, असे महापौर मंगेश पवार यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक रवी साळुंखे यांनी सदर ठेकेदाराकडून त्या दिव्यांग व्यक्तीकडून वसूल करण्यात आलेली सर्व रक्कम परत करण्यात यावी अशी मागणी केली .


