बेळगाव लाईव्ह : हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील डाॅ. मांजरेकर प्लॉटमधील मागासवर्गीयांसाठी राखीव असलेले भू-खंड त्यांना वितरित केले जात नसल्याच्या निषेधार्थ दलित समाज बांधवांनी आज सोमवारी सकाळी हिंडलगा ग्रा. पं. कार्यालयासमोर धरणे सत्ताग्रह करून जोरदार आवाज उठविला.
हिंडलगा ग्रा. पं. कार्यालयासमोर आज छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनात बहुसंख्या दलित बांधव आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हाती घेण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी न्यायाची मागणी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील डाॅ. मांजरेकर प्लॉटमधील मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आलेले भू-खंडांपैकी काहींचे वितरण करण्यात आले आहे तर उर्वरितांचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही.
या भू-खंडांवर हिंडलगा गावच्या श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीने मंदिर, कार्यालय बांधण्यासाठी कब्जा मिळवण्याचा प्रयत्न चालविला असून त्याला कांही ग्रा. पं. सदस्यांचा पाठिंबा असल्याचे आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच आमच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले भू-खंड संबंधित लोकांना देण्यात येऊ नये आणि त्या भू-खंडाचे तात्काळ वाटप केले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना दलित समाज प्रमुख दुर्गाप्पा देवरमणी यांनी सांगितले की, डाॅ. मांजरेकर प्लॉट ही सुमारे 10 एकर जमीन असून पूर्वी ती डाॅ मांजरेकर यांच्याकडून खरेदी केल्यानंतर ग्रामपंचायतीकडून तिचे सुमारे 200 भू-खंड पाडण्यात आले. त्यापैकी फक्त 18 टक्के भू-खंड आम्हा दलित समाज बांधवांना देण्यात आले. उर्वरित भूखंड अद्याप तसेच राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी कांही भू-खंड मंदिर बांधण्यासाठी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न गावातील कांही लोकांकडून केला जात आहे. खरंतर त्या ठिकाणी मंदिराची कांहीच आवश्यकता नाही असे आम्हाला वाटते.
याव्यतिरिक्त गावात पाच मंगल कार्यालयं असताना संबंधित भू-खंडाच्या ठिकाणी आणखी एक मंगल कार्यालय उभारण्याचा घाट रचला जात आहे. तेंव्हा संबंधित भू-खंड मंदिर कार्यालय वगैरे बांधण्यासाठी दिले जाऊ नये. त्याऐवजी ग्रामपंचायतने संबंधित 5 -6 गुंठे किंवा संपूर्ण 19 गुंठे जमीन आम्हा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना द्यावी अशी आमची मागणी आहे.
सदर जमीन ग्रामपंचायतीची मालमत्ता असली तरी त्यापैकी काही जमीन आम्हा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. पंचायत बैठकीच्या विषय पत्रिकेवर संबंधित जागा अनुसूचित जाती जमातीला वितरित करण्याचा विषय देखील आहे. मात्र त्यासंदर्भात कार्यवाही न करता इतर कामे मंजूर केली जात आहेत असे देवरमणी यांनी खेदाने सांगितले.


