बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द श्री महादेव मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा जणांना सीसीबी पोलिसांनी आज अटक करून त्यांच्या जवळील 10.15 ग्रॅम हेरॉईनसह एकूण 32,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे महादेव गजानन पाटील (वय 27, रा. माधव रोड, कंग्राळी खुर्द बेळगाव) आणि विनायक सुब्बराव बेन्नाळकर (रा. पहिला क्रॉस, रामनगर बेळगाव) अशी आहेत हे दोघेजण एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंग्राळी खुर्द श्री महादेव मंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची विक्री करत होते.
त्यावेळी सीसीबी बेळगावचे पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून महादेव आणि विनायक यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील 21,400 रुपये किमतीचे छोट्या छोट्या पुड्यांमध्ये बांधलेले 10.15 ग्रॅम हेरॉईन, 10,000 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि रोख 1 हजार रुपये असा एकूण 32,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पकडलेल्या आरोपींसह मुंबई, सायन कोळीवाडा येथील एका महिलेविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
मार्केट पोलिसांकडून दोघे मटका बुकी गजाआड
खंजर गल्ली, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी मटक्याचे अंक घेणाऱ्या दोघा मटका बुकिंना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील रोख 2,140 रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे रफिक हुसेनसाब मुल्ला (वय 45, रा. कोतवाल गल्ली, बेळगाव) आणि हैमन हसनसाब चिक्कोडी (वय 32, रा. खंजर गल्ली, बेळगाव) अशी आहेत. हे दोघेजण शहरातील खंजर गल्ली येथील सार्वजनिक ठिकाणी मुंबई ओसी मटका खेळत असल्याची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या जवळील रोख 2,140 रुपये आणि अंक लिहिण्यासाठीच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




