बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या फार्मर रजिस्ट्रेशन अँड युनिफाईड बेनिफिशरी इन्फॉर्मेशन सिस्टीम (फ्रुट्स) आयडी नोंदणी अंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील 9 लाख 20 हजार 666 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून या पद्धतीने सदर नोंदणीत बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
कृषी खात्याच्या संकेतस्थळावर सदर माहिती नोंदविण्यात आली आहे. राज्यात फ्रुट्स आयडी नोंदणीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 82 हजार 920 जणांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत बेळगाव मागोमाग मंड्या जिल्हा राज्यात द्वितीय स्थानावर आहे.
मंड्यामध्ये 5 लाख 17 हजार 900 शेतकऱ्यांनी फ्रुट्स आयडी नोंदणी केली आहे. राज्यभरात या नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने 1 लाख 73 हजार 838 जणांनी तर कृषी खात्याने 1 कोटी 3 हजार 199 जणांची नोंदणी करून घेतली आहे. जिल्हा निहाय नोंदणी (अनुक्रमे जिल्हा -नोंदणी यानुसार) पुढील प्रमाणे आहे. बेळगाव -9,20,666. मंड्या -5,17,900. म्हैसूर -5,17,570. हासन -5,00,099. गुलबर्गा-4,68,268. विजापूर -4,63,475.
राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदान देत असते योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र सातबारा उतारा फोटो वगैरे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते
बऱ्याचदा याचा फटका शेतकऱ्यांना बसतो यासाठी सरकारने फ्रुट आयडी नोंदणी सुरू केली असून याद्वारे एकाच ठिकाणी सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते शेतकऱ्यांना एकदाच आपल्या शेतीची माहिती उतारे अपलोड करावे लागतात त्याचा फायदा वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो




