बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील भूतरामन हट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा अभयारण्यातील 30 काळवीटांचा मृत्यू हा संसर्गजन्य आजारामुळे झाला असल्याची माहिती वनमंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी दिली.
ते विधान परिषदेत सदस्य तळवार साबण्णा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार ‘हेमोरॅजिक सेप्टिसीमिया’ या संसर्गजन्य आजारामुळेच काळवीटांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, प्राथमिक दृष्ट्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात दुर्लक्ष आढळून आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्राणी आरोग्य व पशुवैद्यकीय जैविक संस्था, हेब्बाळ, बेंगळूरू येथील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने मृगालयाला भेट देऊन मृत प्राण्यांची तपासणी केली. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी रक्तनमुने व अवयव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
मृगालयातील इतर प्राण्यांना संसर्ग होऊ नये यासाठी सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूण 38 काळवीटांपैकी 31 प्राणी मृत्यूमुखी पडले असून उर्वरित 7 काळवीटांना
सर्व खबरदारीच्या उपायांसह संरक्षित ठेवण्यात आले आहे.
‘हेमोरॅजिक सेप्टिसीमिया’ या आजाराच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक अभयारण्य प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व अभयारण्याच्या कार्यकारी संचालकांना आवश्यक प्रतिबंधात्मक व सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मंत्री खंड्रे यांनी सांगितले.

बेळगाव भुतरामनहट्टी येथील मिनी झू या ठिकाणी काळवीट विभागाला खंड्रेंची भेट
वन्यप्राण्यांच्या अधिक काळजीच्या सूचना – ईश्वर खंड्रे
संसर्गामुळे 31 काळवीटांचा
मृत्यू झालेल्या भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा अभयारण्याला सोमवारी वनमंत्री ईश्वर बी. खंड्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वन्यप्राण्यांच्या आरोग्याबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
काळवीट विभागाला भेट देऊन मंत्र्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मृगालयातील सर्व प्राण्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवावे तसेच वेळेवर लसीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक मीनाक्षी नेगी, पी. सी. रे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


